भारतीय मुस्लिमांबद्दल ओबामांचं सूचक विधान! म्हणाले, "मी मोदींबरोबर संवाद साधला असता तर..."

Barack Obama On Muslim Minorities In India: पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर असतानाच माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये भारतातील अल्पसंख्यांकांचा उल्लेख करत सूचक विधान केलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 23, 2023, 01:13 PM IST
भारतीय मुस्लिमांबद्दल ओबामांचं सूचक विधान! म्हणाले, "मी मोदींबरोबर संवाद साधला असता तर..." title=
एका मुलाखतीमध्ये ओबामांनी केलं भाष्य

Barack Obama On Muslim Minorities In India: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर (PM Modi in US) आहेत. गुरुवारी त्यांनी व्हाइट हाऊसमध्ये (White House) राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) आणि जिल बायडेन यांनी आयोजित केलेल्या विशेष भोजन समारंभाला हजेरी लावली. यावेळी दोघांनाही प्रसारमाध्यमांशी चर्चा केली. एका प्रश्नाला उत्तर देताना मोदींनी भारतामध्ये लोकशाही असून सर्वांच्या हक्कांचं संरक्षण केलं जातं असं म्हटलं. एकीकडे मोदींच्या या दौऱ्याची चर्चा असतानाच दुसरीकडे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (Barack Obama) यांनी एक मोठं विधान केलं आहे. ओबामा यांनी एका मुलाखतीमध्ये, भारतामधील अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेसंदर्भात चिंता व्यक्त करताना अमेरिकी राष्ट्रध्यक्षांनी मोदींकडे नक्कीच हा मुद्दा मांडला पाहिजे असं म्हटलं आहे. 

...तर नक्कीच हा मुद्दा मांडला पाहिजे

मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर असतानाच ओबामा यांनी सीएनएनला दिलेल्या मुलाखतीमध्ये, भारताने अल्पसंख्यांकांच्या हक्कांचं संरक्षण केलं नाही तर मतभेद वाढून दुही निर्माण होण्याचा धोका असल्याचं म्हटलं. ओबामा यांनी मुलाखतीमध्ये आपण मोदींबरोबर वातावरण बदल आणि इतर अनेक विषयांवर काम केल्याचा उल्लेख केला आहे. मात्र त्याचवेळी भारतीय लोकशाहीबद्दल वाढत असलेल्या चिंतेसंदर्भातील चर्चाही दोन्ही देशांमध्ये व्हायला हवी असंही ओबामा म्हणाले. तसेच अमेरिकी राष्ट्राध्यक्ष मोदींना भेट असतील तर त्यांनी, 'हिंदू बहुसंख्यांक असलेल्या भारतामधील मुस्लीम अल्पसंख्यांकाच्या सुरक्षेसंदर्भातील' मुद्दा नक्कीच मांडला पाहिजे असंही म्हटलं.

भारताच्या हिताच्या विरोधात

"मी मोदींना फार चांगल्यापद्धतीने ओळखतो. जर मी मोदींबरोबर संवाद साधला असता तर नक्कीच हा मुद्दा मांडला असता की जर तुम्ही अल्पसंख्यांकांच्या हक्कांचं संरक्षण केलं नाही तर एक वेळ अशी येईल की भारतामध्ये दुही निर्माण होईल. अशाप्रकारे अंतर्गत कलह होतात तेव्हा काय होतं हे आपण सर्वांनी पाहिलं आहे. असं घडलं तर ते भारताच्या हिताच्या विरोधात असेल," असं ओबामांनी मुलाखतीत म्हटलं.

...तर मला नाही असं म्हणावं लागेल

"सध्याच्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षांकडे अनेक गुण आहेत. मी अध्यक्ष होतो, तेव्हा मी काही प्रकरणांमध्ये मित्रपक्ष कोण होते हे सर्वांना माहीत आहे. ते त्यांची सरकारे आणि त्यांचे राजकीय पक्ष ज्याप्रकारे चालवतात त्याला मी आदर्श लोकशाही म्हणेन का? असा प्रश्न तुम्ही माझ्यावर खाजगीत विचारला तर मला नाही असं म्हणावं लागेल," असं सूचक विधान ओबामा यांनी केलं.

काँग्रेसकडून या मुलाखतीचा व्हिडीओ शेअर करत टोला

ओबामा यांच्या याच मुलाखतीचा काही भाग काँग्रेसच्या प्रवक्त्या आणि सोशल मीडिया प्रमुख सुप्रिया श्रीनाते यांनी ट्वीट केला आहे. "यामध्ये मोदींचे मित्र 'बराक' यांनी त्यांना एक संदेश दिला आहे. असा अंदाज आहे की ते मोदींविरोधातील आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहेत का? किमान भक्त तरी असं म्हणतील," असा टोला सुप्रिया यांनी लगावला आहे. 

दरम्यान, मोदींच्या भेटीच्या आधी काही अमेरिकी सिनेट्सने भारतामधील लोकशाही आणि अल्पसंख्यांकांचा मुद्दा बायडेन यांनी मोदींसमोर उपस्थित करण्याची मागणी केली होती.