बेरुत : लेबननची राजधानी असललेल्या बेरुतमध्ये मंगळवारी संध्याकाळी दोन भीषण स्फोट झाले. या घटनेत ७८ ठार तर ४००० हून अधिक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या स्फोटांचा व्हिडिओही समाजमाध्यमांत जोरदार व्हायरल होत आहे. हे स्फोट इतके भीषण होते की आजूबाजूच्या इमारतींना मोठा हादरा बसला. लोकांना वाटले भूकंप झाला. मोठा हादरा आणि भूकंपाची शक्यता वाटून नागरिक भीतीने बाहेर पडले. प्रत्येकांच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट दिसून येत होते.
मध्य आशियामधील लेबनान देशाची राजधानी स्फोटाने हादरल्याने अनेकांना धक्का बसला. या स्फोटांमध्ये ७८ जण ठार झाले आहेत तर ४००० जण जखमी झाले आहेत. लेबनानमधील आरोग्य अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दोन्ही स्फोट भयंकर होते. या स्फोटांनी कानठळ्या बसल्या. स्फोट झालेल्या जागेपासून १५ मैल अंतरावरील सर्व घरांच्या, इमारतींच्या काचा फुटल्या. शहरांमधल्या अनेक रस्त्यांवर धुराचे लोट पाहण्यास मिळाले.अनेक गाड्यांवर इमारतींचे अवशेष पडल्याने रस्त्यांवर नासधुस झालेल्या गाड्यांच्या रांगा पाहायला मिळाल्या. अनेक ठिकाणी रक्तबंबाळ अवस्थेमध्ये स्थानिक लोक मदतीसाठी वाट पाहतानाचे चित्र दिसून येत होते.
हे स्फोट नेमके कशामुळे झाले हे समजू शकलेले नाही. मात्र हे दोन इतके भयानक स्फोट होता की त्यामुळे बेरुत संपूर्ण हादरुन गेले. पंतप्रधान हसन दियाब यांनी राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.