Word Of The Year : 2024 मध्ये गुगलवर सर्वाधिक गाजला 'हा' अनपेक्षित शब्द; त्याचा नेमका अर्थ माहितीये?

Oxford University Word Of The Year 2024 : अरेच्चा! हा शब्द सर्च करणाऱ्यांपैकीच एक तुम्हीही एक आहत? पाहा त्याचा नेमका अर्थ आहे तरी काय...   

सायली पाटील | Updated: Dec 4, 2024, 10:52 AM IST
Word Of The Year : 2024 मध्ये गुगलवर सर्वाधिक गाजला 'हा' अनपेक्षित शब्द; त्याचा नेमका अर्थ माहितीये?  title=
Brain Rot Oxford University Word Of The Year 2024 what does that mean

Oxford University Word Of The Year 2024 : एखादा नवा शब्द, एखाद कलाकृती, एखादी संकल्पना या आणि अशा कैक प्रश्नांची उत्तरं गुगलकडे शोधली जातात. आपल्याला जी माहिती नाही, ती मिळवण्यासाठी अनेकजण सर्रास या Google चीच मदत घेतात. दरवर्षी, दर दिवशी आणि दर क्षणाला गुगलवर कोण ना कोण, काही ना काही शोधत असतं अर्थात Search करत असतं. 

दरवर्षी असा एखादा शब्द असतो, जो सातत्यानं आणि सर्वाधिक वेळा गुगलवर सर्च होतो. याच यादीत आता आणखी एका शब्दाची भर पडली आहे. 2024 मध्ये हाच शब्द सर्वाधिक गाजला असून, ब्रिटनच्या ऑक्सफर्ड युनिवर्सिटीनं त्याची उकल केली आहे. 

'वर्ड ऑफ द इयर'ची घोषणा ऑक्सफर्ड विद्यापीठानं केली असून, इथं असे शब्द निवडले जातात ज्यांच्याविषयी वर्तमानकाळाच्या अनुषंगानं सर्वाधिक Search केलं जातं. त्यानुसार 2024 या वर्षामध्ये 'वर्ड ऑफ द इयर' ठरलेला शब्द म्हणजे, 'ब्रेन रॉट' (Brain Rot). दिवसभर सोशल मीडियावर विनाकारण ये-जा करत स्क्रोल करणाऱ्यांसाठी हा शब्द लागू असून, तुम्हीही सोशल मीडियावरच सतत वावरत असाल तर, तुम्हीही 'ब्रेन रॉट'चे शिकार आहात, कारण आता या शब्दाला जागतिक स्तरावर मान्यतासुद्धा मिळाली आहे. 

ब्रेन रॉट आणि सोशल मीडियाचा नेमका काय संबंध? 

मागील दोन दशकांमध्ये विविध सोशल मीडिया माध्यमांची उपलब्धता पाहायला मिळाली. जगभरातून मोठ्या संख्येनं मोबाईल युजर या माध्यमांचा सातत्यानं वापर करू लाहली. काहींनी इथंही अतिरेक केला. मोबाईलधारकांच्या सवयी इतक्या बदलल्या की सुरुवातीला या माध्यमांवर तासन् तास घुटमळणारी ही मंडळी जिथं जातील तिथं मोबाईल सोबत नेऊ लागली.

या संपूर्ण प्रक्रियेमुळं आणि सोशल मीडियाच्या वारेमाप वापरामुळं या मंडळींची विचार करण्याची क्षमता प्रभावित झाली आणि इथंच 'ब्रेन रॉट' या शब्दाचा उदय झाला. या शब्दाचा थेट संबंध मानसिक स्थितीशी येत असून, सोशल मीडियाच्या अतिवापरामुळंच ही स्थिती उदभवताना दिसत आहे. 

Brain Rot म्हणजे काय? 

ब्रेन रॉट या शब्दाचा अर्थ होतो, मेंदू सुस्तावणं किंवा विचार करण्याची क्षमता कमी होणं. अधिकाधिक वेळ ऑनलाईन राहिल्यामुळं आणि त्यातही प्रामुख्यानं सोशल मीडियावर बराच वेळ वाया घालवल्यामुळं, नको नको त्या गोष्टी पाहिल्यामुळं त्याचा थेट परिणाम मेंदू आणि आकलन क्षमतेवर होतो. बऱ्याचदा हा परिणाम इतका नकारात्मक असतो की, विचार करण्याची क्षमता आणि वेग मंदावतो.  कैक तास सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्क्रोल केल्यानं मेंदूचं होणारं नुकसान हीच या 'ब्रेन रॉट' या शब्दाची व्याख्या सांगितली जाते. 

हेसुद्धा वाचा : सोन्याहून पिवळं! MHADA च्या सोडतीमध्ये 'ते' अर्जदार ठरले लाभार्थी; पाहा कोणाचं नशीब फळफळलं

ऑक्सफर्ड विद्यापीठानं या शब्दाची व्याख्या तयार केली असून, त्यानुसार ऑनलाईन कंटेट पाहिल्यामुळं एखाद्या व्यक्तीचं मानसिक संतुलन बिघडणं, ज्यामुळं ती व्यक्ती विचार करणं टाळते. सोप्या शब्दांत समजून घ्यायचं झाल्यास ब्रेन रॉट म्हणजे अशा गोष्टी पाहणं आणि त्यामुळं प्रभावित होणं ज्या तुमचा मेंदू सुस्तावतात. 

ब्रेन रॉट या शब्दाचा थेट संबंध हल्लीच्या दिवसांशी आणि प्रामुख्यानं सध्याच्या Digital युगाशी येत असला तरीही या शब्दाचा जन्म मात्र 19 व्या शतकातील असल्याचं सांगितलं जातं. 1854 मध्ये डेव्हिड हेन्री थोरोनं 'वॉल्डेन' या पुस्तकामध्ये या शब्दाचा पहिल्यांदाच उल्लेख केला होता. सामाजिक दिखाव्यावर टीका करताना त्यानं हा शब्द वापरला होता.