Video Rohit Sharma Scolds Yashasvi Jaiswal: भारतीय संघ सोमवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेच्या दुसऱ्या कसोटीसाठी अॅडलेडमध्ये दाखल झाला. ऑस्ट्रेलिया प्रायमिनिस्टर्स 11 च्या संघाविरुद्ध कॅनबेरा येथे मनुका ओव्हलच्या मैदानावर भारतीय संघाने 2 दिवसांचा सराव सामना खेळल्यानंतर ते अॅडलेडमध्ये दाखल झाले. भारतीय संघाने पर्थ येथे झालेली पहिली कसोटी 295 धावांनी जिंकत मालिकेला विजयासहीत सुरुवात केली. त्यानंतरच्या पिंक बॉल सराव सामन्यातही त्यांनी चांगली कामगिरी केली. आता भारताचा पुढचा सामना अॅडलेडमध्ये 6 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. याच सामन्यासाठी अॅडलेडला निघताना भारताचा सलामीवीर यशस्वी जयसवालला कर्णधार रोहित शर्माने विमानतळावरच झापल्याचं दिसून आलं. हा व्हिडीओ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने शेअर केला आहे.
झालं असं की, अॅडलेडला निघताना संपूर्ण संघ एकत्र प्रवास करत होता. सर्व खेळाडू एकामागे एक चालत असतानाच अचानक रोहित शर्मासहीत सर्वांनाच यशस्वी जयसवाल हा 'नो एन्ट्री'चा बोर्ड लिहिलेल्या एरियामध्ये दिसला. यशस्वी जयसवाल हा चुकून दुसऱ्याच भागात शिरला. त्याच्या आणि इतर खेळाडूंच्यामध्ये काचेची भिंत असल्याने यशस्वीला या बाजूला कसं यायचं हे समजत नव्हतं. तो पूर्णपणे गोंधळून गेला होता. हा सारा प्रकार पाहून कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल आधी हसले आणि त्यांनी यशस्वीची खिल्ली उडवली. मात्र त्यानंतर रोहित शर्माने आपल्या या तरुण सहकाऱ्याला झापल्याचं व्हिडीओत पाहायला मिळालं.
यशस्वी जयसवालने घातलेल्या गोंधळावरुन शुभमन गिल त्याचा चिडवत होता. बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये गिलने जयसवालला प्रवेश निषिद्ध असलेल्या भागात प्रवेश करताना पाहिल्यानंतर, "तो अडकला आहे. येथे प्रवेश निषिद्ध आहे असं तिथे लिहिलेलं आहे. तू जवळ गेलास तर तो दरवाजा आपोआप उघडेल. जर तू जवळ गेला तरच होईल," असं म्हणाला. त्यानंतर रोहित शर्माने आपल्या खास शैलीमध्ये यशस्वी जयसवालला झापताना, "तू तिथे कशाला गेलास?" असा सवाल विचारला. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ...
Banter check
Hat check
Travel day #TeamIndia have arrived in Adelaide #AUSvIND pic.twitter.com/hRDUfOTcpf
— BCCI (@BCCI) December 3, 2024
सध्या भारत बॉर्डर-गावसकर चषकाच्या पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. पहिली कसोटी आणि दुसऱ्या कसोटीदरम्यान 10 दिवसांचा कालावधी असल्याने या काळात भारतीय संघाने एक दोन दिवसांचा सराव सामना खेळून घेतला. अॅडलेडमध्ये खेळवला जाणारा हा सामना डे-नाईट सामना असणार आहे.