नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प २४ ते २६ फेब्रुवारी दरम्यान भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांची ही पहिलीच भारत भेट असणार आहे. अनेक महिन्यांपासून दोन्ही देशात चर्चेत असलेल्या व्यापार करारावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांत सामरिक आणि आर्थिक संबंध दृढ करण्यासाठी ही भेट महत्त्वाची असेल.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात भेट होणार असून दोन्ही देशांचे प्रमुख अहमदाबादमध्ये संयुक्त कार्यक्रमाला संबोधित करु शकतात. ट्रम्प यांचा हा भारत दौरा अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
अमेरिकेच्या सरकारकडून आयटीसी मौर्या हॉटेल देखील बुक केल्याची माहिती मिळते आहे. याआधी देखील या हॉटेलमध्ये अनेक देशांच्या राष्ट्राध्यक्षांच्य़ा राहण्य़ाची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्यामध्ये बराक ओबामा आणि बिल क्लिंटन यांचा समावेश आहे. ट्रम्प यांचा भारत दौरा हा यावेळी महत्त्वाचा आहे. कारण पाकिस्तान यूएन ह्यूमन राइट्स काउंसिलमध्ये भारताच्या विरोधात बोलत आहे.
काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर पाकिस्तान याला अजूनही विरोध करत आहे. पुन्हा पुन्हा हा मुद्द्या पाकिस्तानकडून उचलला जात आहे. पण आतापर्यंत कोणत्याची मोठ्य़ा देशाने पाकिस्तानला समर्थन दिलेलं नाही.