चीनमध्ये औषधांचा तुटवडा, संत्र्यासाठी लोकांची हाणामारी...चिनी सरकारविरोधात जनतेचा संताप

चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचं थैमान,  कुचकामी ठरलेली लस आणि फसलेली धोरणंयामुळे चीनच्या जनतेचा संताप  

Updated: Dec 24, 2022, 08:05 PM IST
चीनमध्ये औषधांचा तुटवडा, संत्र्यासाठी लोकांची हाणामारी...चिनी सरकारविरोधात जनतेचा संताप  title=

China Corona News : कोरोनामुळे चीनमध्ये भयानक परिस्थिती निर्माण झालीय. लॉकडाऊनमुळे (Lockdown) लोक त्रासलेत. अशातच कोरोना रूग्णांसाठी आवश्यक असलेली औषधं (Medicines) संपल्यानं लोकं इतर उपायांकडे धाव घेतायेत. रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढेल म्हणून एका संत्र्यासाठी लोक हाणामारी करताना दिसतायेत. चीनमधील विदारक स्थिती दाखवणारा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. एका संत्र्यासाठी लोकांची अक्षरश: झुंबड उडालीय. पीपीई किट नाहीत, औषधं नाहीत त्यामुळे डिटेंशन केंद्रात (Detention Center) ठेवलेले रूग्ण चांगलेच संतापलेत. लाखो नागरीक रस्त्यावर उतरून राष्ट्रपती शी जिनपिंग (Xi Jinping) यांना शिव्यांची लाखोली वाहतायेत. चीनची कुचकामी ठरलेली लस आणि सरकारची फसलेली धोरणं यामुळे ओमायक्रॉनच्या (Omicrona) नव्या व्हेरियंटने (Variant) धुमाकूळ घातलाय. 

चीनमध्ये औषधांचा तुटवडा
चीनमध्ये तापावरील औषधं मिळणं कठीण होऊन बसलंय. औषधांचा तुटवडा असल्यानं चीन सरकारनं तापाच्या गोळ्यांसाठी आयकार्ड बंधनकारक केलंय. प्रत्येक व्यक्तीला आठवड्यासाठी फक्त 6 गोळ्याच खरेदी करता येतील.  सरकारी अधिकाऱ्यांनी औषधांच्या आणि टेस्ट किट निर्माण करणा-या कंपन्या ताब्यात घेतल्या आहेत. दुसरीकडे औषधांप्रमाणेच डॉक्टर्स, नर्सेसचीही कमतरता भासतेय. राजधानी बिजिंगमध्ये परिस्थिती खराब असून देशभरातून अतिरिक्त डॉक्टर्स आणि नर्सेसना बिजींगमध्ये (Beijing) बोलावण्यात आलंय. 

चीनकडून रुग्णांच्या आकड्यांची लपवाछपवी
चीननं ICUमध्ये उपचार घेत असलेल्या रूग्णांचे आकडे कमी दाखवण्यास सुरूवात केलीय. मात्र वस्तूस्थिती पूर्णत: वेगळी आहे.  ICUत रूग्ण दाखल करायलाही जागा नाही असं चित्र इथं पाहायला मिळतंय. ओमायक्रॉनचा (Omicron) नवा व्हेरियंट BF.7 नं चीनमध्ये धुमाकूळ घातलाय. मात्र या व्हेरियंटबाबत (Variant) चीनकडून WHOला योग्य माहिती देण्यात आलेली नाही. 

हे ही वाचा : कोरोना नियंत्रणानासाठी मुंबई महापालिका किती सज्ज? पाहा कोणत्या रुग्णालयात किती बेड राखीव

दरदिवशी 10 लाख रुग्णांची नोंद होणार?
दरम्यान एका मीडिया रिपोर्टनुसार चीनमध्ये प्रत्येक 24 तासात 10 लाख कोविड रुग्ण आणि 5 हजार मृत्यूंची नोंद होऊ शकते. लंडनमधल्या एका संस्थेचा हवाला देत हा अहवाल देण्यात आला आहे. ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट BF.7 मुळे पुढच्या महिन्यापर्यंत दैनंदिन रुग्णांची संख्या 3.7 मिलियनपर्यंत पोहोचू शकते अशी भीती वर्तवण्यात आली आहे. 

 या सगळ्याचा परिणाम म्हणून चीनी जनतेत सरकारविरोधत प्रंचंड रोष पाहायला मिळतोय. लोक आता रस्त्यावर उतरले आहेत. चीननं परिस्थिती वेळीच आटोक्यात आणली नाही तर येत्या काही दिवसात चीनमध्ये कोरोनासोबत जनतेचा मोठा उद्रेक पाहायला मिळेल.