चीनकडे थोडीथोडकी नव्हे, तर एक हजार अण्वस्त्र ?

आता बातमी देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची.  

Updated: Feb 3, 2021, 07:22 PM IST
चीनकडे थोडीथोडकी नव्हे, तर एक हजार अण्वस्त्र ?

बीजिंग : आता बातमी देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची. चीनकडे थोडीथोडकी नव्हे, तर एक हजार अण्वस्त्र असल्याची माहिती समोर आली आहे. (China has a thousand nuclear weapons) अमेरिकेवर (America) कुरघोडी करण्याचा चीनचा प्रयत्न असला, तरी भारतालाही त्याचा धोका आहेच.

कोरोनासारखं जैविक अस्त्र वापरून सगळ्या जगाला वेठीस धरणारा चीन आता थेट विनाशक अण्वस्त्र वापरण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चीनकडे तब्बल 1 हजार अण्वस्त्र असून त्यातील 100 अस्त्र ही कोणत्याही क्षणी हल्ल्यासाठी तयार ठेवण्यात आली आहे. शिवाय हवेतून दूरवार मारा करणारी मिसाईल तयार करण्यासाठी जोरदार संशोधन सुरू आहे. अमेरिकेची मुख्य भूमी अण्वस्त्रांच्या टप्प्यात आणण्याचा चीनचा प्रयत्न दिसत आहे.

अधिकृतरित्या सध्या 9 देशांकडे अण्वस्त्र आहेत. जगातल्या एकूण अण्वस्त्रापैकी तब्बल 90 टक्के अण्वस्त्र अमेरिका आणि रशिया या दोघांकडेच आहेत. रशियाकडे 6 हजार 375 तर अमेरिकेकडे 5 हजार अण्वस्त्र आहेत. चीनकडे 320 अण्वस्त्र असल्याची अधिकृत आकडेवारी असली, तरी हा आकडा फसवा असल्याचं समजतंय. एका चिनी लष्करी अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार चीनकडे तब्बल 1 हजार अण्वस्त्र आहेत. 

शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर अमेरिका आणि रशिया आपल्याकडील अण्वस्त्रांची संख्या कमी करत असताना चीनचा प्रवास मात्र उलट्या दिशेनं सुरू आहे. चीन शेजारी असल्यामुळे अर्थातच आपल्यासाठीदेखील ही धोक्याची घंटा आहे. शिवाय आपलं शत्रुराष्ट्र असलेला पाकिस्तान चीनचा मित्र आहे. त्यामुळे हा धोका अधिकच वाढतो.

अर्थात, चीनचे सर्वेसर्वा राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या परवानगीशिवाय ही अण्वस्त्र डागता येणार नाहीत, हे खरं. मात्र जागतिक महासत्ता होण्याचं वेड काय करायला लावेल, याचा नेम नाही. मात्र एकदा अणूयुद्धाचा भडका उडाला, तर तो पृथ्वीवरची जीवसृष्टी नष्ट करण्यास पुरेसा ठरेल. त्यामुळेच चीनचे मनसुबे वेळीच उधळून लावणं आवश्यक आहे.