लद्दाख सीमेवरुन मागे सरकलं चीनी सैन्य, आज पुन्हा होणार चर्चा

भारत-चीन मधील तणाव कमी होण्याच्या शक्यता

Updated: Jun 10, 2020, 09:24 AM IST
लद्दाख सीमेवरुन मागे सरकलं चीनी सैन्य, आज पुन्हा होणार चर्चा title=

नवी दिल्ली : भारत आणि चीन दरम्यान लद्दाख सीमेवर असलेला तणाव आता कमी होताना दिसत आहे. लद्दाख सीमेवरुन चीनी सैन्या मागे सरकलं आहे. आज बुधवारी पुन्हा दोन्ही सैन्यांच्या कमांडर यांच्यात चर्चा होऊ शकते. ज्यामुळे हा तणाव कायमचा संपवला जावू शकतो.

भारत आणि चीनच्या सैन्यांदरम्यान अजून काही वेळा चर्चा होणार आहे. पण मंगळवारी बातमी आली की, गलवान, पेट्रोलिंग प्वाइंट 15 आणि हॉट स्प्रिंग भागातून चीनी सैन्य दोन किलोमीटर मागे सरकलं आहे. चीनी सैन्य मागे गेल्यानंतर भारतीय सैन्य देखील काही अंतर मागे आलं आहे.

मेपासून सुरु असलेला हा तणाव आता मावळताना दिसत आहे. आज होणाऱ्या बैठकीत हा तणाव कायमचा मिटवण्याचा दोन्ही देशांचा प्रयत्न असेल. मंगळवारी चीनने गलवान घाटाजवळ २ बोटी देखील तैनात केल्या होत्या. त्या देखील मागे हटवण्यात आल्या आहेत. त्यानंतर भारताने देखील काही वाहनं आणि सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

आता पुढे कमांडर स्तरावर चर्चा होणार आहे. ज्यामध्ये सीमेवरील तणाव मिटवण्यासाठी चर्चा होईल. पण भारतीय सैन्य सावध आहे. प्रत्येक हालचालीवर त्यांची नजर आहे. भारताकडून प्रत्येक स्थितीत लढण्याची तयारी आहे. भारतीय सैन्याकडून असे संकेत देखील मिळत आहेत की, डोकलाम सारखी स्थिती तयार झाली तर भारतीय सैन्य पूर्णपणे तयार आहे.

भारत आणि चीन यांच्यात ६ जूनला लेफ्टिनेंट जनरल लेवलवर चर्चा झाली होती. जो चुशूलमध्ये ही चर्चा झाली होती. यानंतर शांतीचा प्रस्ताव निघाला. आता बुधवारपासून पुन्हा चर्चा सुरु होणार आहेत. दोन्ही देशांकडून चर्चेने तणाव मिटवण्याबाबत भाष्य देखील करण्यात आले आहे.