नवी दिल्ली : चीनी कंपन्यांत कर्मचाऱ्यांना दिली जाणारी वर्तुवणूक अनेकदा चर्चेचा विषय ठरते. कधी टार्गेट पूर्ण करण्यात अपयश आलं म्हणून कर्मचाऱ्यांना रस्त्यावर कुत्र्यांसारखं चालवण्यासाठी, सर्वांसमक्ष कानाखाली वाजवण्यासाठी तर कधी चाबकाचे फटके देण्यासाठी या कंपन्यांवर अनेकदा टीका झालीय. सध्या चीनमधली आणखी एक कंपनी चर्चेत आहे... पण ती कर्मचाऱ्यांना शिक्षा देण्यासाठी नव्हे तर बोनस देण्यासाठी... या कंपनीनं आपल्या ५००० कर्मचाऱ्यांना बोनस दिलाय. परंतु, सोशल मीडियावर ही चर्चा सुरू आहे ती या बोनसच्या रक्कमेची नव्हे तर ती ज्या पद्धतीनं कर्मचाऱ्यांना वाटण्यात आली त्या पद्धतीची...
चीनच्या जियाशी प्रांतात नान्चांग शहरात या कंपनीचा स्टील प्लान्ट उभारण्यात आलाय. या कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना ४४ दशलक्ष डॉलर आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये बोनस म्हणून वाटलेत. पण, हा बोनस देण्यासाठी कंपनीनं वेगळीच पद्धत वापरलीय...
हा बोनस कर्मचाऱ्यांना त्यांच्या योगदानाप्रमाणे वाटण्यात आला नाही... तर यासाठी कर्मचाऱ्यांसमोर ४४ दशलक्ष डॉलर्सच्या रोख रक्कमेचा एक मोठा डोंगर उभारण्यात आला... आणि मग प्रत्येक कर्मचाऱ्याला निर्धारित वेळेमध्ये पैसे गोळा करण्यास सांगण्यात आला... कर्मचाऱ्यांना ठराविक वेळेत जितके पैसे गोळा करता आले तेवढी रक्कम त्याची... ही पद्धत या बोनसची खासियत ठरली.
अशावेळी पैसे गोळ्या करण्याच्या या अनोख्या स्पर्धेत प्रत्येक कर्मचाऱ्यानं जवळपास ६२ ते ६५ लाखांपर्यंत रक्कम मिळवली. परंतु, एवढ्या मोठ्या प्रमाणात मिळालेली रक्कम खर्च करायची तरी कशी? असा प्रश्न आता या कर्मचाऱ्यांना पडलाय.
परंतु, बोनस देण्याच्या या पद्धतीवर अनेकांनी टीकाही केलीय. चीनमध्ये अशा पद्धतीनं बोनस जाहीर करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही... यापूर्वीही एका कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना एका गेमशोच्या आधारावर रोख रक्कम जमवण्याचा टास्क दिला होता. यामध्येही कर्मचाऱ्यांना एका निर्धारित वेळेत रोख रक्कम जमा करायची होती.