अमेरिकेत पसरली मोठ्या प्रमाणात कांजिण्यांची साथ

अमेरिकेतून १९६३ सालीच कांजिण्यांचं निर्मुलन झाल्याचा दावा

Updated: Jan 29, 2019, 03:41 PM IST
अमेरिकेत पसरली मोठ्या प्रमाणात कांजिण्यांची साथ title=

वॉशिंग्टन : भारतीयांनो अमेरिकेत जात असाल तर सावधान. अमेरिकेत सध्या कांजिण्यांची साथ मोठ्या प्रमाणात पसरली आहे. राजधानी वॉशिंग्टनमध्ये कांजिण्यांची मोठी साथ आहे. एरवी भारत आणि इतर विकसनशील देशात कांजिण्या, गोवर हे रोग होतात असे गैरसमज पसरवणाऱ्या अमेरिकेत आता कांजिण्यांची साथ पसरली आहे हे विशेष. यापेक्षाही धक्कादायक म्हणजे या कांजिण्यांशी सामना कसा करावा याबाबत अमेरिकेच्या आरोग्य विभागात संभ्रम आहे. या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो असा अंदाज यंत्रणांनी व्यक्त केला आहे. अमेरिकेतून १९६३ सालीच कांजिण्यांचं निर्मुलन झाल्याचा दावा केला जात होता. मात्र आता हा रोग पुन्हा एकदा उफाळून आला आहे. न्यूयॉर्कपासून कॅलिफोर्नियापर्यंत शेकडो नागरिकांना कांजिण्या झाल्या आहेत.

कांजिण्यांमुळे त्रासलेल्या अमेरिकेत सोशल मीडियावरून अफवांचं पिकही आलंय. एवढंच नाही तर कित्येक अफवा या लसीकरणाविरोधात आहेत. कांजिण्याचं लस घेतल्याने आत्ममग्नता येते वगैरे अफवाही पसरवल्या जात आहेत. अमेरिकेत जाणाऱ्या भारतीयांना असल्या अफवांवर कृपया विश्वास ठेऊ नये... लसीकरण मोहिमेला अमेरिकन नागरिकच मोठ्या प्रमाणात विरोध करत असल्याने आरोग्य यंत्रणा हतबल झाल्या आहेत.