'मेड इन इंडिया iPhone 15 अजिबात घेऊ नका,' भारताचं यश पाहून चीन घाबरला? म्हणतो 'भारतीय घाणेरडे, वरणाचा वास...,'

चीनमधील सोशल मीडिया वीबोवर युजर्स मेड इन इंडिया iPhone 15 वरुन भारताची खिल्ली उडवत आहेत. मेड इन इंडिया iPhone 15 चा कव्हर काढताच तुम्हाला वरणाचा वास येईल असं ते म्हणत आहेत.   

शिवराज यादव | Updated: Sep 25, 2023, 06:49 PM IST
'मेड इन इंडिया iPhone 15 अजिबात घेऊ नका,' भारताचं यश पाहून चीन घाबरला? म्हणतो 'भारतीय घाणेरडे, वरणाचा वास...,' title=

अॅप्पलने नुकतीच आपली नवी सीरिज iPhone 15 लाँच केली आहे. दरम्यान अॅप्पलने भारतात निर्मिती करण्यात आलेले iPhone 15 ही लाँच केले आहेत. जगभरात iPhone 15 लाँच झाला त्यादिवशीच हे मेड इन इंडिया आयफोनही लाँच झाले. दरम्यान चीनमध्ये निर्मिती करण्यात आलेले iPhone 15 युरोप आणि अमेरिकी बाजारात लाँच होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. तर भारतात निर्मिती झालेले iPhone 15 खासकरुन चिनी बाजारात विकण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. 

या चर्चांदरम्यान चीनमधील सोशल मीडियावर भारतामधील निर्मित iPhone 15 चा उल्लेख करत वेगवेगळ्या कमेंट केल्या जात आहेत. यादरम्यान पातळी ओलांडली जात आहे. भारतावर वर्णवादी तसंच वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट करण्यात आल्या आहेत. 

चीनमधील सोशल मीडिया वीबोवर युजर्सनी भारतीयांवर उपहासात्मकपणे टीका करताना म्हटलं आहे की, मेड इन इंडिया आयफोन 15 चा कव्हर हटवताच तुम्हाला वरणाचा वास येईल. भारतात हे चालतं पण आपल्यासाठी स्वच्छतेची बाब आहे. 

मेड इन इंडिया आयफोनवरुन चीनचे टोलेबाजी

एका दुसऱ्या पोस्टमध्ये हाताने वरण आणि भात खाणाऱ्या भारतीयांवर भाष्य करण्यात आलं आहे. पोस्टमध्ये लिहिलं आहे की, हाताने वरण भात खाल्ल्यानंतर हे लोक आपले डोळे चोळतात आणि नंतर फोनलाही हात लावतात. भारतात निर्मिती करण्यात आलेले आयफोन संक्रमित असू शकतात असंही ते म्हणाले आहेत. 

ब्लूमबर्गने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितलं होतं की, अॅप्पल आता मेड इन इंडिया आयफोन विकणार आहे. या रिपोर्टनंतर चीनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अंदाज लावले जात आहेत. या अफवांदरम्यान चीनमधील सोशल मीडिया वीबोवर 'जर तुम्ही चीनमध्ये नवा आयफोन खरेदी केला तर, भारतात तयार केलेला आयफोन मिळू शकतो,' अशी चर्चा सुरु आहे. याच्याशी संबंधित हॅशटॅगही ट्रेंड होत आहे. या हॅशटॅगवरुन चीनमध्ये वेगवेगळे मीम्सही तयार होत आहेत. 

काही युजर्स जर आपण चुकून भारतीय निर्मितीचा आयफोन खरेदी केला तर काय होईल यावर सल्ले माहत आहेत. यादरम्यान काहीजण भारत मागासलेला देश असल्याची बतावणी करत आहेत. 
 

भारताचं वर्चस्व वाढत असल्याने चीन घाबरला?

चिनी पत्रकार वेनहाओ यांनी कशाप्रकारे काही चिनी हँडलर्स अॅप्पलच्या मॅन्युफॅक्चरिंग नेटवर्कमध्ये भारताच्या वाढत्या भूमिकेवरुन निशाणा साधत आहेत यावर भाष्य केलं आहे. भारतात तयार करण्यात आलेले 50 टक्के आयफोन 15 परत पाठवले असल्याचा खोटा दावाही केला जात आहे. पण चीनमधील सरकारी वृत्तापत्राने अॅप्पल कंपनीमधील अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हा दावा चुकीचा असल्याचं स्पष्ट केलं आहे. चीनमध्ये निर्मिती झालेले आयफोन 15 फक्त युरोप आणि अमेरिकी बाजारासाठी नाहीत, तसंच भारतात निर्मिती झालेले आयफोन 15 फक्त चिनी बाजारांसाठी नाहीत हे त्यांनी स्पष्ट केलं आहे.