आई शप्पथ, यांनी मांडलाय आईच्या दुधाचा बाजार, आईच्या दुधाची शक्ती 'या' दुधात नाहीच

नवजात बाळासाठी आईचं दूध (breast feeding) अमृतासारखं असतं. स्तनपानामुळे बाळाची वाढ चांगली होते आणि पुढे आयुष्यभर त्याचं आरोग्यही उत्तम राहतं.

Updated: Feb 24, 2022, 09:54 PM IST
आई शप्पथ, यांनी मांडलाय आईच्या दुधाचा बाजार, आईच्या दुधाची शक्ती 'या' दुधात नाहीच title=
प्रातिनिधिक छायाचित्र

विशाल करोळे, औरंगाबाद, झी 24 तास : नवजात बाळासाठी आईचं दूध अमृतासारखं असतं. स्तनपानामुळे बाळाची वाढ चांगली होते आणि पुढे आयुष्यभर त्याचं आरोग्यही उत्तम राहतं. मात्र काही खासगी कंपन्यांनी याच दुधाला बदनाम करण्याचं षडयंत्र हाती घेतलंय. आता थेट WHO आणि UNICEFनं या रॅकेटचा भांडाफोड केला आहे. (companies selling formula milk have set marketing breastfeeding can be weakened)

नवजात बाळांसाठी आईचं दूध हा सर्वोत्तम आहार आहे हे सरकार आणि आरोग्य यंत्रणा ओरडून ओरडून सांगतात. पण वास्तव मात्र वेगळंच आहे. 

डब्बाबंद दूध विकणाऱ्या खासगी कंपन्यांचं मार्केटिंग या सकस दुधावर भारी पडलंय. WHO आणि UNICEFनं यावर एक खळबळजनक खुलासा केलाय. कृत्रिम दुधाचा फॉर्म्युला हे जगभरातील एक मोठं षडयंत्र असल्याचं या अहवालात म्हंटलंय.

जास्तीत जास्त मातांनी ब्रेस्ट फिडिंग ऐवजी बाळाला डब्बाबंद दूध द्यावं यासाठी खासगी कंपन्यांनी रचलेला सुनियोजित कट आहे, असा दावा WHO आणि UNICEFनं केलाय. त्यासाठी ऑनलाईन हेल्पलाईन तयार करण्यात आली. डब्बाबंद दुधाच्या प्रमोशनसाठी मोफत गिफ्ट देण्यात आले. 

इतकंच नाही तर डॉक्टर्स आणि हेल्थ वर्क्सनाही यात सामील करून घेण्यात आलं. जगभरात या कृत्रिम दुधाचा व्यापार तब्बल 55 बिलियन डॉलर्सवर पोहचल्याचंही या अहवालात म्हंटलंय.

तब्बल आठ देशांमध्ये सर्वेक्षण केल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं बड्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय. आता बेबी फूड इंडस्ट्री आणि त्यांच्या मार्केटिंगला चाप लावण्यासाठी WHOनं कडक पावलं उचलली आहेत.

आईच्या दुधाचा बाजार   

कायद्यानुसार भारतात डॉक्टरांना डब्बाबंद दुधाचं प्रमोशन करणं किंवा डब्बाबंद दूध लिहून देण्यास सक्त मनाई आहे. अपवाद फक्त खादी माता बाळाला स्तनपान करू न शकल्यास किंवा नवजात बाळाच्या मातेचा मृत्यू झाल्यास डॉक्टर्स कृत्रिम दूधाचा पर्याय देऊ शकतात.

भारतात सध्याच्या घडीला 56 टक्के माता या बाळासाठी डब्बाबंद दुधाचा उपयोग करतात. हे दूध बाळाच्या रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम करतं.

त्यामुळे तुम्ही माता असाल तर आपल्या बाळाला डब्बाबंद दुधाचा आहार देऊ नका. तुमचं बाळ सदृढ असावं असं वाटत असेल स्तनपान हाच उत्तम मार्ग आहे.