नवी दिल्ली : चीनच्या वुहान शहरातून सुरु झालेल्या कोरोना Corona व्हायरसने पाहता पाहता अवघ्या दोन चार महिन्यांमध्ये संपूर्ण जगात थैमान घातलं. लाखोंच्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येऊ लागते. कित्येकांना यात आपले प्राणही गमवावे लागले. अशा या संपूर्ण परिस्थितीत संभाव्य हानी टाळण्यासाठी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी म्हणून अनेक राष्ट्रांमध्ये सक्तीच्या लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले. देशच्या देशच लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे बहुतांश, जवळपास सगळीच हवाई वाहतूक, रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतून इतकंच नव्हे तर नागरिकांचं दैनंदिन जीवनही ठप्प झालं.
कोरोनाशी दोन हात करण्यासाठी शक्य त्या सर्व मार्गांनी संपूर्ण जग एकवटलं आहे. आपआपल्या परिने त्यांचा लढा सुरुच आहे. या साऱ्यामध्ये प्रत्येकजण एखाद्या दिलासादायक बातमीच्या शोधात आहे. सर्वत्र भीतीचं आणि नकारात्मक वातावरण पाहायला मिळत असतानाच आता एक अतिशय आनंदाची अशी माहिती समोर आली आहे. ज्याचा संबंध संपूर्ण मानव प्रजाती, सजीव सृष्टी किंबहुना संपूर्ण पृथ्वीशीच आहे. ही बातमी आहे ओझोनच्या थराची. पृथ्वीभोवती असणाऱ्या ओझोनच्या थराचं आतार्यंत झालेलं नुकसान पाहता बरीच चिंता व्यक्त केली जात होती. पण, आता मात्र सागरी लहरी, ऋतूचक्र या साऱ्यावर थेट परिणाम करणारा ओझोनचा थर बऱ्याच अंशी पूर्वपदावर येत असल्याचं सांगण्यात येत आहे.
गेल्या काही वर्षांपासून अनेक मानवी कृतींमुळे या ओझोनच्या थराचा ऱ्हास होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. सूर्यापासून निघणारी घातल किरणं शोषणाऱ्या ओझोनच्या थराला छिद्रही झाल्याचं सांगण्यात आलं होतं. पण, आता मात्र हे छिद्रही आपोआप भरत असल्याची बाब समोर येत आहे.
युनिव्हर्सिटी ऑफ कोलोरॅडो बोल्डरच्या संशोधकांच्या निदर्शनास आल्यानुसार पृथ्वीच्या दक्षिण भागात असणाऱ्या अंक्टार्टिका भागावर असणाऱ्या ओझोनच्या थरावरील छिद्र आता भरु लागलं आहे. कारण, चीनच्या बाजून जाणारं प्रदूषण आता त्या दिशेला जात नाही.
लॉकडाऊन होण्यापूर्वी प्रदूषणाचा स्तर अधिक होता. परिणामी पृथ्वीच्या पृष्ठावरुन जाणारी जेट स्ट्रीम म्हणजे अशा प्रकारची हवा जी अनेक राष्ट्रांवरुन जाते ती ओझोनवरील छिद्रामुळे पृथ्वीच्या दक्षिणेकडेच जास्त जासत होती. पण, आता मात्र चित्र बदललं आहे. हा बदल ठराविक काळासाठी असला तरीही तो अतिशय सकारात्मक असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे. एकिकडे लॉकडाऊनमुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला आणि दैनंदिन जीवनमानाला फटका बसला असला तरीही पर्यावरण आणि या पृथ्वीच्या अनुशंगाने शिवाय कोरोनाला आळा घालण्याच्याही दृष्टीने लॉकडाऊन काही अंशी फायद्याचं ठरत आहे हे नाकारता येणार नाही.