मुंबई : भारतासह जगात देखील कोरोनाचा कहर वाढत आहे. कोरोनाची पुन्हा एकदा लाट आल्याने अनेक देशांमध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत. कोरोनामुळे मृत्यूंची संख्या देखील वाढत आहे. गेल्या 24 तासांत जगात 14 हजाराहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला. तर या कालावधीत जगभरात 8 लाख 70 हजारांहून अधिक नवीन रुग्णांची वाढ झाली आहे.
जगात 24 तासांत 14 हजार मृत्यू
जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार, शनिवारी सकाळी कोरोना रूग्णांची संख्या 15 कोटी 9 लाख 72 हजार 476 वर पोहोचला आहे. एक दिवस आधी हा आकडा 15 कोटी 1 लाख 2 हजार 206 इतका होता. गेल्या 24 तासांत 14 हजार 417 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूंची संख्या 31 लाख 76 हजार 54 वर गेली आहे. शुक्रवारपर्यंत ही संख्या 31 लाख 61 हजार 637 इतकी होती.
अमेरिकेत 60 हजार नवीन प्रकरणे
अमेरिकेत गेल्या 24 तासांमध्ये जवळपास 60 हजार नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यासह एकूण संक्रमितांची संख्या 3 कोटी 31 लाखांहून अधिक आहे. आतापर्यंत 5 लाख 90 हजाराहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिका आणि भारत नंतर ब्राझील सर्वाधिक प्रभावित देश आहे.
ब्राझीलमध्ये 2,870 जणांचा मृत्यू
शुक्रवारी ब्राझीलमध्ये 73 हजाराहून अधिक नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. एकूण संक्रमितांची संख्या 1 कोटी 46 लाखांपेक्षा जास्त आहे. एका दिवसात 2,870 रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा 4 लाख 4 हजारांवर गेला आहे.
इराण : एका दिवसात 19 हजार 272 नवीन रुग्ण आढळल्यामुळे संक्रमित लोकांची संख्या सुमारे 25 लाखांवर गेली आहे. येथे एकूण 71 हजार 758 जणांचा मृत्यू झाला आहे.
तुर्की : कोरोनाच्या तिसर्या लाटेत या देशात 31 हजार 891 नवीन रुग्ण आढळले आहे. कोरोना रुग्णांची संख्या 48 लाखांवर गेली आहे.
रशिया : 24 तासांत देशात 9 हजार 270 नवीन रुग्ण आढळले असून, एकूण रुग्णांची संख्या 48 लाख 14 हजार झाली आहे. एकूणच 1 लाख 10 हजाराहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पाकिस्तानमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय उड्डाणे 20 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील वाढत्या साथीवर अंकुश ठेवण्याच्या प्रयत्नात घेतलेला हा निर्णय 20 मे पर्यंत लागू राहणार आहे. गेल्या 24 तासांत पाकिस्तानमध्ये 4,696 नवीन संक्रमित लोकं आढळले असून आणि 146 जणांचा मृत्यू झाला आहे.