टेक्सास: देशभरात कोरोनाचं संकट आहे जे कमी होण्याचं नाव घेत नाही. हा कोरोना सतत आपली रूपं बदलत आहे. अशा परिस्थितीमध्ये आता म्युकरमायकोसिस, डेंग्यू, बर्ल्ड फ्लूचा धोका आहे. त्यामध्ये आता विचित्र आजार समोर आला आहे. एका व्यक्तीनं नुकतंच अफ्रीका (नाइजीरिया)हून जाऊन आला होता. त्या व्यक्तीमध्ये विचित्र लक्षणं आढळून आली आहेत. त्याला सध्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
या व्यक्तीच्या अंगावर लाल फोड उठले आहेत. त्याच्या संपर्कात आलेल्या बाकी लोकांना शोधण्याचं काम सुरू आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार हा आजार मंकीपॉक्स असल्याची माहिती मिळाली आहे. अमेरिकेच्या टेक्सास इथे राहणाऱ्या व्यक्तीमध्ये हा आजार दिसून आला आहे. हा आजार खूप भयंकर असल्याचं सांगितलं जात आहे.
या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना शोधण्याचं काम सुरू आहे. ज्यामुळे या आजाराचा प्रकोप होण्यापासून रोखायला प्रशासनाला यश मिळेल. 18 वर्षांपूर्वी अशाच प्रकारच्या आजारानं कहर केला होता. आता पुन्हा एकदा अमेरिकेत हा दुर्मीळ आजार आपलं डोकं वर काढत आहे. त्यामुळे अमेरिकेतील प्रशासनाची चिंता वाढली आहे.
यूएसए टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, आरोग्य अधिकारी म्हणाले आहेत की COVID-19 पासून बचाव करण्याच्या उपाययोजनांमुळे माकेंपॉक्स रोगाबद्दल सर्वसामान्यांना होणारा धोका कमी आहे. शिवाय या आजाराचा संसर्ग होण्याचा धोका कमी असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तज्ज्ञांच्या मते हा आजार दुर्मीळ असला तरी तो रौद्र रुप धारण करू शकतो.
शरीरावर लाल रॅशेस आणि फोड येतात. या आजाराचा संसर्ग 2 ते 4 आठवड्यांपर्यंत राहू शकतो. हा आजार प्राण्यांच्या संपर्कात आल्याने किंवा त्यांनी चावल्यामुळे होतो असं सांगितलं जातं. याचा संसर्ग श्वसनातून किंवा लाळेतून होऊ शकतो. त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे. मंकीपॉक्सचा प्रकोप अफ्रीकेमध्ये झाला होता. 2003 मध्ये 47 जणांना या आजाराची लागण झाल्याचं समोर आलं होतं.