नवी दिल्ली : जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत दोन लाखांहून अधिकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना संसर्गामुळे मृतांच्या आकड्यात दिवसागणिक वाढ होत आहे. कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना वेग-वेगळ्या देशांमध्ये वेग-वेगळे नियम आहेत. अनेक देशांमध्ये कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना मृत शरीराला स्पर्श करण्याची परवानगी नाही.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीला जाळलं किंवा दफनही केलं जाऊ शकतं असल्याचं सांगितलं आहे. कुटुंबिय मृत व्यक्तीला केवळ दूरुनच पाहू शकतात. मृतावर अंत्यसंस्कार करताना स्पेशल टीमद्वारे केले जातात. या टीममधील लोकांना याबाबत खास ट्रेनिंग देण्यात येतं. मृतांवर अंत्यसंस्कार करणारे वैद्यकीय कर्मचारी PPE किट घालून मृतावर अंत्यसंस्कार करतात. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर PPE किट फेकून देऊन हात स्वच्छ करावे लागतात.
मुस्लिम आणि ख्रिश्चनांमध्ये मृतदेहाला अग्नि देण्याऐवजी दफन करण्याची प्रथा आहे. परंतु काही देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता मृतदेह जाळण्याचे आदेश दिले आहेत. यामागे दोन महत्त्वाची कारणं आहेत. एक म्हणजे मोठ्या प्रमाणात होत असलेल्या मृत्यूंमुळे काही देशांमध्ये मृतदेह दफन करण्यासाठी जागेची कमतरता आहे. आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे, मृतदेह दफन करण्याच्या तुलनेत मृतदेह जाळल्याने व्हायरस नष्ट होण्याची शक्यता अधिक असते.
चीनमधील नॅशनल हेल्थ कमिशनने, कोरोनामुळे बळी गेलेल्यांचे मृतदेह जाळण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत.
चीनप्रमाणे श्रीलंकेतही मृतदेह जाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मृताचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असेल किंवा कोरोनाची अगदी सौम्य लक्षणं असतील तरीही खबरदारीचा उपाय म्हणून मृतदेह जाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अमेरिकेतील सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिवेंशनद्वारा देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, लोक आपल्या धर्म आणि प्रथेनुसार मृतावर अंत्यसंस्कार करु शकतात. परंतु यात 10 हून अधिक लोक सामिल होऊ शकत नाही. त्याशिवाय मृतदेहाला कुटुंबियांनी स्पर्श करु नये, असंही सांगण्यात आलं आहे.
ब्रिटनच्या नॅशनल असोसिएशन ऑफ फ्यूनरल डायरेक्टर्सच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, मृताच्या नातेवाईकांना अंतिम संस्कार करण्याची परवानगी आहे, परंतु त्यांनी अंत्यसंस्कार करण्यास उशीर करु नये, कुटुंबातील काही लोकच अंत्यसंस्कारसाठी उपस्थित राहू शकतात.
इटलीमध्ये अंत्यसंस्कारांसाठी कठोर नियम आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीला रुग्णालयातील कपड्यांवरच दफन केलं जातं. मृतदेहासोबत 2 ते 4 लोक जाऊ शकतात. परंतु त्यांना मृतदेह पाहण्याचीही मुभा नाही.
इस्त्राईलमध्ये मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना त्याचा चेहरा पाहण्याची परवानगी आहे. परंतु यावेळी त्यांना PPE किट घालणं अनिर्वाय आहे. मृतदेहावर करण्यात येणाऱ्या प्रथा ट्रेंड वॉलेंटियरकडूनच करण्यात येतात.
भारतात प्रथेनुसार, मृतदेहाला अग्नी देण्याची किंवा दफन करण्याची परवानगी आहे. परंतु मृतदेहावर कोणत्याही प्रथा करु शकत नाही. भारत सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, कोरोनाबाधित मृतदेह ट्रेंड हेल्थकेयर वर्करच घेऊन जाऊ शकतात. हेल्थ केयर वर्कर आणि मृताच्या कुटुंबियांना PPE किट घालणं अनिर्वाय आहे.