लंडन : कोरोना महामारीमुळे अनेक देशांचे आर्थिक तसेच सामाजिक नुकसान झाले आहे. तसेच या विषाणूमुळे अनेक लोकांनी त्यांचे प्राण देखील गमवले आहे. त्यामुळे जगातील सगळेच शास्त्रज्ञ हा विषाणू नक्की आला कुठून किंवा तो कसा तयार झाला यावरती संशोधन करत आहेत. त्यानंतर अनेक देशांकडून अशी शक्यता वर्तवली गेली, की हा विषाणू चीनमधील वुहान लॅबमधून बाहेर आला होता.
यावर अमेरिकेच्या लॅबोरेटरीने संशोधन करायला सुरवाती केली. वॉल स्ट्रिटच्या अहवालानुसार, अमेरिकन सरकारच्या नॅशनल लॅबोरेटरीने कोविड -19 च्या ऑरिजनवर (Coronavirus Origin)निष्कर्ष काढला आहे की, तो विषाणू वुहान शहरातील चिनी लॅब 'इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी'मधूनच बाहेर पडला आहे आणि त्याबद्दल पुढील चौकशी केली जाईल.
अध्यक्ष जो बिडेन यांनी गेल्या महिन्यात इंटेलिजन्स एजंसीला या विषाणूचे ऑरिजन शोधण्याचे निर्देश दिले होते. ते म्हणाले की, "अमेरिकन गुप्तचर संस्था व्हायरसच्या ऑरिजनसंदर्भात दोन संभाव्य परिस्थितींचा विचार करत आहेत. पहिला म्हणजे लॅबमध्ये अपघात झाल्यानंतर हा विषाणू बाहेर पडला किंवा दुसरे म्हणजे विषाणू एखाद्या संक्रमित प्राण्यांद्वारे मानवी शरीरात शिरला."
अमेरीकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत हा दावा करत होते की, व्हायरस लॅबमधून बाहेर पडला आहे. परंतु बिडेन म्हणाले की, आतापर्यंत गुप्तचर संस्था कोणत्याही निष्कर्षावर पोहोचू शकलेली नाहीत.
त्याचवेळी अमेरिकन सरकारच्या सूत्रांनी सांगितले की, माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कारकिर्दीत प्रसारित झालेल्या अमेरिकन गुप्तचर अहवालात म्हटले आहे की, नोव्हेंबर 2019 मध्ये चीनमधील वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीचे तीन संशोधक इतके आजारी पडले होते की, त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. परंतु, त्यांना नक्की कोणत्या आजाराची लागण झाली होती, याची माहिती देण्यात आलेली नाही.
त्यामुळे अमेरिकन अधिकाऱ्यांनी चीनवर विषाणूच्या उत्पत्तीविषयी पारदर्शकता दाखवली नाही असा आरोप केला आहे. तर दुसरीकडे बीजिंगने हे आरोप सातत्याने फेटाळले आहेत.