close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

'...तर मनमोहन सिंग पाकिस्तानवर हल्ला करणार होते'

मनमोहन सिंग यांच्याशी माझे चांगेल ऋणानुबंध जुळले होते. ते खरेच एक संत व्यक्तिमत्त्व आहे.

Updated: Sep 20, 2019, 08:04 AM IST
'...तर मनमोहन सिंग पाकिस्तानवर हल्ला करणार होते'

लंडन: मुंबईवरील २६\११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर पुन्हा भारतावर अशाप्रकारचा हल्ला झाला असता तर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग पाकिस्तानविरुद्ध लष्करी कारवाईचे आदेश देणार होते, असा गौप्यस्फोट ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी केला आहे.

डेव्हिड कॅमेरॉन यांच्या 'फॉर द रेकॉर्ड' या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले. या पुस्तकात कॅमेरॉन यांनी आपल्या खासगी व व्यावसायिक जीवनातील अनुभव सांगितले आहेत. यामध्ये त्यांनी २०१० ते २०१६ कालावधीतील तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग आणि नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या भेटीगाठींवर प्रकाश टाकला आहे. सन २०१० ते २०१६ या काळात डेव्हिड कॅमेरून तीन वेळा इंग्लंडचे पंतप्रधान म्हणून भारत दौऱ्यावर आले होते.

यावेळी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याविषयीचे अनुभव सांगताना कॅमेरॉन यांनी म्हटले आहे की, मनमोहन सिंग यांच्याशी माझे चांगेल ऋणानुबंध जुळले होते. ते खरेच एक संत व्यक्तिमत्त्व आहे. सदाचरणी व्यक्तिमत्त्वाचे मनमोहन शांत स्वभावाचे असले, तरी देशाच्या अस्मितेप्रति त्यांची भूमिका कणखर होती. मुंबईवरील २६/११ सारखा दहशतवादी हल्ला पुन्हा झाला असता, तर मनमोहनसिंग पाकिस्तानविरोधात लष्करी कारवाई करण्याच्या तयारीत होते, असे कॅमेरॉन यांनी सांगितले. 

याशिवाय, कॅमेरॉन यांनी पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या भेटीविषयीही भाष्य केले आहे. नोव्हेंबर २०१५मधील विम्ब्ली स्टेडिअमवरील मोदींची गळाभेट, राजधानी दिल्लीतील टुकटुकमधील प्रवास ते मुंबईतल्या झोपडपट्टीतील सफर यांसह अमृतसरमधील सुवर्ण मंदिराला दिलेली भेट व जालियनवाला बाग हत्याकांडाबाबतची दिलगिरी यांचा त्यांनी पुस्तकात आवर्जून उल्लेख केला आहे.

२०१० च्या इंग्लंडमधील सार्वत्रिक निवडणुकीत तेथील १५ लाख भारतीय समुदायाने आपल्या बाजूने मतदान केले. त्याचा निवडणुकीत आपल्याला फायदा झाला होता, अशीही आठवण डेव्हिड कॅमेरून यांनी आपल्या पुस्तकात लिहिली आहे.