काहिरा : एका देशाच्या माजी राष्ट्रपतींवर न्यायालयात खटला सुरू असतानाच ते धाडकन जमिनीवर कोसळले... आणि त्यातच त्यांचा मृत्यू झालाय. ही घटना घडलीय इजिप्तमध्ये (मिस्र)... इजिप्तचे माजी राष्ट्रपती मोहम्मद मुर्सी न्यायालयात सुनावणी सुरू असताना कोसळले आणि त्यांचं निधन झालं. देशाच्या सरकारी टीव्हीनं ही माहिती दिलीय. स्थानिक सरकारी टीव्हीनं दिलेल्या माहितीनुसार, ६७ वर्षीय माजी राष्ट्रपतींवर हेरगिरीच्या आरोपांखाली न्यायालयात सुनावणी सुरू होती. न्यायालयाच्या आदेशानुसार ते सुनावणीसाठी स्वत: उपस्थित राहिले होते. परंतु, भर न्यायालयात ते अचानक बेशुद्ध झाले. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु एव्हाना त्यांचं निधन झालं होतं.
मोहम्मद मुर्सी यांची २०१२ साली देशाची राष्ट्रपती म्हणून निवड झाली होती. दीर्घकाळ इजिप्तचे राष्ट्रपती राहिलेल्या होस्नी मुबारक यांना पदच्चूत केल्यानंतर ही निवडणूक पार पडली होती.
देशातील सर्वात मोठा इस्लामी समूह असलेल्या 'मुस्लीम ब्रदरहूड'शी मोहम्मद मुर्सी निगडीत होते. ही संस्था आता बेकायदेशीर म्हणून घोषित करण्यात आलीय.
इजिप्तमध्ये झालेल्या विरोध प्रदर्शनानंतर २०१३ साली सैन्यानं मुर्सी यांची खुर्ची रिकामी करत 'इस्लामी ब्रदरहूड'वर वर्चस्व मिळवलं होतं. यावेळी, सेनेनं मोहम्मद मुर्सी यांच्यासहीत अनेक नेत्यांना अटक केली होती.