एसटी महामंडळाचा मोठा निर्णय, एअर होस्टेसच्या धर्तीवर बसमध्ये आता 'शिवनेरी सुंदरी'

ST Mahamandal Shivneri : एअर होस्टेसच्या धर्तीवर आता एसटीच्या ई- शिवनेरी बस मध्ये 'शिवनेरी सुंदरी' नेमण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.  एस. टी. महामंडळाची 304 व्या बैठक पार पडली. यावेळी अध्यक्ष भरत गोगावले यांनी या योजनेला मंजुरी दिली.

राजीव कासले | Updated: Oct 1, 2024, 06:19 PM IST
एसटी महामंडळाचा मोठा निर्णय, एअर होस्टेसच्या धर्तीवर बसमध्ये आता 'शिवनेरी सुंदरी' title=

मनश्री पाठक, झी मीडिया, मुंबई : एअर होस्टेसच्या धर्तीवर आता एसटीच्या ई- शिवनेरी बस मध्ये 'शिवनेरी सुंदरी' (Shivneri Sundari) नेमण्याचा निर्णय एसटी महामंडळाने (MSRTC) घेतला आहे. एस. टी. महामंडळाची 304 व्या बैठक पार पडली. यावेळी अध्यक्ष भरत गोगावले (Barat Gogavale) यांनी या योजनेला मंजुरी दिली. पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर आदरातिथ्य व्यवस्थापनाची सेवा देणारी परिचारिका (शिवनेरी सुंदरी) नेमण्यात येणार आहे. प्रवाशांच्या तिकिटावर कोणताही अधिभार न लावता प्रवाशांना चांगल्या सेवा सुविधा देण्याकरता `शिवनेरी सुंदरी' नेमली जाणार आहे.

एसटी महामंडळाच्या बैठकीत इतर काही योजनांनाही मान्यता देण्यात आली आहे.

आनंद आरोग्य केंद्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील स्वर्गीय आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ एसटीच्या 343 बस स्थानकांवर 'आनंद आरोग्य केंद्र' या नावाने दवाखाना सुरू करण्यात येणार असून, अत्यंत माफक दरामध्ये बस स्थानकांवरील प्रवाशां बरोबरच आसपासच्या सर्व नागरिकांना कमी दरामध्ये विविध आरोग्य चाचण्या आणि औषधे एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी संबंधित संस्थांना बसस्थानकांवरील 400 ते 500 चौ.सेमी. ची जागा उपलब्ध करून देण्यात येईल. तिथे त्या संस्थेने आरोग्य तपासणी दवाखाना, पॅथॉलॉजी लॅब आणि औषध दुकान सुरू करून सेवा द्यायची आहे.

मूल आणि धारणी इथं नवे आगार निर्माण होणार

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल आणि अमरावती जिल्ह्यातील धारणी या आदिवासी बहुल प्रदेशांमध्ये एसटीचे नवे आगार निर्माण करण्यात येणार असून या आगाराच्या निर्मितीनंतर एसटीच्या एकूण आगारांची संख्या 253 होणार आहे.

प्रत्येक बस स्थानकांवर महिला बचत गटांना स्टॉल उघडण्यास जागा

एस. टी. महामंडळाच्या प्रत्येक बस स्थानकांवर त्या परिसरातील महिला बचत गटांना आपले स्थानिक पदार्थ विक्री करण्यासाठी चक्रीय पद्धतीने नाममात्र भाडे आकारुन 10X10 आकाराचा स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उपरोक्त निर्णयाबरोबरच नवीन 2500 साध्या बसेस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू करणे तसेच 100 डिझेल बसेसचे प्रायोगिक तत्त्वावरील इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर करणे