Elon Musk On X Subscription : काही दिवसांपूर्वीचं ट्विटर अन् सध्याच्या एक्स प्लॅटफॉर्मची (Platform X) मालकी इलॉन मस्क (Elon Musk) यांच्याकडे गेल्यापासून मोठमोठे बदल होताना दिसत आहेत. अशातच इलॉन मस्क यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे नेटकऱ्यांवर थेट परिणाम होणार आहे. नुकतंच इलॉन मस्क यांनी दिलेल्या माहितीनुसार आता एक्स प्लॅटफॉर्म वापरण्यासाठी महिन्याला पैसे द्यावे लागतील. त्यांच्या या वक्तव्यानंतर जगभरात चर्चेला उधाण आलं आहे. कंपनी युजर्सकडून पैसे घेण्याची तयारी का करत आहे? किती शुल्क आकारले जाऊ शकते? याची सविस्तर माहिती पाहुया...
इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी थेट संभाषणादरम्यान मस्क यांनी महत्त्वाची माहिती दिली. इलॉन मस्क यांनी यावेळी सांगितलं की, गेल्या काही महिन्यात एक्सच्या अॅड्स रेवेन्यूमध्ये तब्बल 60 टक्क्यांची कमतरता जाणवत आहे. सिविल राईट्स सह आणखी काही कंज्युमर ग्रुप आणि कंपन्या आमच्यावर प्रेशर तयार करत आहे, असं मस्क यांनी म्हटलंय. त्यावेळी त्यांनी आधुनिक टेक्नोलॉजीवर देखील भर देत असल्याचं सांगितलं. त्यावेळी त्यांनी एक्सवर काही लहान प्रमाणात पैसे लावले जाऊ शकतात, असं देखील म्हटलंय. त्याचबरोबर त्यांनी प्रिमियम सर्विसचा देखील उल्लेख केलाय.
दरम्यान, इलॉन मस्कने स्पष्टपणे सांगितलं आहे की, X वापरण्यासाठी वापरकर्त्यांना दर महिन्याला शुल्क म्हणून काही पैसे द्यावे लागतील. त्याऐवजी, वापरकर्ते जाहिराती पाहणं टाळू शकतात. मात्र, दरमहा किती पैसे भरावे लागतील आणि ही योजना किती काळ राबविण्याचे नियोजन आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
इस्त्राईलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी हेट स्पीच मोठं आव्हान असल्याचं वक्तव्य केलंय. द्वेषयुक्त भाषण आणि बॉट आर्मी हे मोठे आव्हान असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अशी प्रकरणे केवळ इस्रायलमध्येच नाही तर भारतातही पाहायला मिळत आहेत, असा उल्लेख त्यांनी केला. CAPTCHA टेस्टिंगमध्ये सध्या AI बोट्सचा वापर होतो आणि अधिक अचूकपणे तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, असं नेतन्याहू यांनी म्हटलं आहे.
आणखी वाचा - 'पाच दिवसात देश सोडा', भारताचं जशास तसं उत्तर; कॅनडाच्या राजदूताची हकालपट्टी!
दरम्यान, आत्तादेखील तुम्ही X प्रीमियम घेऊ शकतात. वेबवर चालविण्यासाठी मासिक 650 रुपये आणि मोबाइल आवृत्तीवर 900 रुपये शुल्क आकारले जाते. ब्लू सबस्क्रिप्शन प्लॅन 6,800 रुपये प्रति वर्ष आहे. यामध्ये यूजर्सना अनेक अतिरिक्त फीचर्ससह ब्लू टिक मिळेल. आता ही योजना मोठ्या प्रमाणात म्हणजे सर्वांसाठी जारी केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता नेटकऱ्यांच्या खिशाला कात्री बसणार हे नक्की...