Hardeep Singh Nijjar: 'पाच दिवसात देश सोडा', भारताचं जशास तसं उत्तर; कॅनडाच्या राजदूताची हकालपट्टी!

India-Canada Tensions : कॅनडाच्या संसदेला संबोधित करत असताना कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) यांनी शीख नेते हरदीप सिंह निज्जरच्या हत्येत भारतीय दलालांचा हात असू शकतो, असं बेताल वक्तव्य केलं होतं.

Updated: Sep 19, 2023, 06:02 PM IST
Hardeep Singh Nijjar: 'पाच दिवसात देश सोडा', भारताचं जशास तसं उत्तर; कॅनडाच्या राजदूताची हकालपट्टी! title=

India Vs Canada : खालिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जर (Hardeep Singh Nijjar) याची हत्या झाल्यानंतर भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध बिघडल्याचं (India-Canada Tensions) पहायला मिळत आहे. कॅनडाने भारतावर हरदीपसिंह निज्जर याच्या हत्येचा आरोप केला. त्यानंतर आता भारताने देखील कॅनडाला जशास तसं उत्तर देत एका उच्च भारतीय राजदुताला (Canadian Diplomat) देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता दोन्ही देशातील वाद चिघळल्याचं पहायला मिळतंय. परराष्ट्र मंत्रालयाकडून एक निवेदन जारी करून यासंदर्भात माहिती देण्यात आलीये. त्यामुळे आता भारताने कॅनडला जोरदार प्रत्युत्तर दिल्याचं सांगितलं जातंय.

कॅनडाच्या संसदेला संबोधित करत असताना कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो  (Justin Trudeau) यांनी शीख नेते हरदीप सिंह निज्जरच्या हत्येत भारतीय दलालांचा हात असू शकतो, असं बेताल वक्तव्य केलं होतं. त्यानंतर जागतिक पातळीवर हा मुद्दा चर्चेत आला. कॅनडाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी देखील हत्येमागे भारताचा हात असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे भारताने एक निवेदन जारी केलं अन् कॅनडाने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. त्याचबरोबर कॅनडाच्या राजदुताला देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. कॅनडा सरकारकडून करण्यात आलेला हा हत्येचा आरोप अत्यंत हास्यास्पद आणि राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचं भारताने म्हटलं आहे.

कॅनडाच्या उच्चायुक्तांना देश सोडायला लावल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने निवेदन जारी केलं अन् स्पष्टीकरण दिलं आहे. कॅनडाच्या भारतातील उच्चायुक्तांना आज पाचारण करण्यात आलं.  नवी दिल्लीत उपस्थित असलेल्या एका वरिष्ठ कॅनेडियन राजदुताला हे निर्देश दिले आहे. त्यांना पाच दिवसांची मुदत देखील देण्यात आलीये. आमच्या अंतर्गत बाबींमधील हस्तक्षेप आणि भारतविरोधी कारवायांमध्ये त्यांचा सहभाग असल्याने कारवाई करण्यात आल्याचं परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलंय.

आणखी वाचा - भारत विरुद्ध कॅनडा संघर्ष शिगेला : कॅनडीयन PM जस्टीन ट्रुडोंना भारताने सुनावलं! म्हणाले, "अशा लोकांबद्दल तर..."

कॅनडामध्ये खून, मानवी तस्करी आणि संघटित गुन्हेगारी यासह बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांना आश्रय देणं हे नवीन नाही. असेच आरोप कॅनडाच्या पंतप्रधानांनी आपल्या पंतप्रधानांवर केले होते आणि ते पूर्णपणे फेटाळून लावले होते. कायद्याच्या राज्यासाठी दृढ वचनबद्ध असलेला आपला लोकशाहीचा देश आहे, अशी प्रतिक्रिया परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. 

हरदीप सिंग निज्जर आहे तरी कोण?

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्रालयाने 2020 मध्ये निज्जरला दहशतवादी घोषित केलं होतं. 18 जून रोजी कॅनडातील सरे येथे खलिस्तानी दहशतवादी निज्जर याची हत्या झाली होती. गुरुद्वाराबाहेर त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. गेली अनेक वर्ष तो कॅनडात राहत होता. त्याचबरोबर परदेशातून तो भारताविरुद्धच्या कारवाईवर खतपाणी घालत होता. त्याचबरोबर त्याच्यावर अनेक वर्ष बिश्नोई गँगला पैसे पुरवल्याचा आरोप आहे. 

दिवसभराच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी झी 24 तासशी कनेक्ट व्हा -  CLICK LINK