'वर्ल्ड बँके'च्या अध्यक्षपदी विराजमान होणार भारतीय वंशाच्या इंद्रा नुयी?

वर्ल्ड बँकेचे सध्याचे अध्यक्ष जिम योंग किम यांनी या महिन्याच्या सुरुवातीला फेब्रुवारी महिन्यात पदावरून पायउतार होणार

Updated: Jan 16, 2019, 12:46 PM IST
'वर्ल्ड बँके'च्या अध्यक्षपदी विराजमान होणार भारतीय वंशाच्या इंद्रा नुयी? title=

न्यूयॉर्क : व्हाईट हाऊसकडून 'वर्ल्ड बँक'च्या अध्यक्षपदासाठी 'पेप्सिको' या कंपनीच्या माजी सीईओ इंद्रा नुयी यांच्या नावाचा विचार सुरू असल्याचं समजतंय. भारतात जन्मलेल्या ६३ वर्षीय नुयी यांनी १२ वर्षांपर्यंत पेप्सिकोची जबाबदारी यशस्वीरित्या हाताळल्यानंतर गेल्या ऑगस्ट महिन्यात त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. 'द न्यूयॉर्क टाईम्स'नं दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांक ट्रम्प हिनं नुयी यांना 'प्रशासकीय सहकारी' म्हटलंय. उल्लेखनीय म्हणजे, इवांका वर्ल्ड बँकेच्या नव्या प्रमुखाच्या नामांकन प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका निभावताना दिसतेय.

वर्ल्ड बँकेच्या प्रमुख पदासाठीची निवड प्रक्रिया अद्याप प्राथमिक पातळीवर असल्याची सूत्रांची माहिती आहे. असं असलं तरी आपल्या नावाचा वर्ल्ड बँकेच्या अध्यक्षपदासाठी विचार व्हावा किंवा नाही तसंच नुयी या नामांकन स्वीकार करणार किंवा नाही याबद्दल अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. 

इवांकानं पेप्सिकोच्या माजी सीईओ इंद्रा नुयी यांना 'मार्गदर्शक तसंच प्रेरणास्रोत' म्हणत त्यांचं नाव या पदासाठी पुढे केल्याची माहिती मिळतेय. राष्ट्राध्यक्ष कार्यालय व्हाइटहाऊसनं हे याआधीच स्पष्ट केलंय की ट्रम्प यांची मुलगी इवांका वर्ल्ड बँकेच्या अध्यक्षपदाची उमेदवार नसेल. ट्रम्प सरकारमध्ये इवांका ही वरीष्ठ सल्लागार आहे.  

वर्ल्ड बँकेचे सध्याचे अध्यक्ष जिम योंग किम यांनी या महिन्याच्या सुरुवातीला फेब्रुवारी महिन्यात पदावरून पायउतार होणार असल्याचं सांगितलंय. यानंतर ते एका 'प्रायव्हेट इन्फ्रास्ट्रक्चर' क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कंपनीला साथ देतील.