गुरुद्वारावर भ्याड दहशतवादी हल्ला

या हल्ल्याची माहिती मिळताच... 

Updated: Mar 25, 2020, 06:25 PM IST
गुरुद्वारावर भ्याड दहशतवादी हल्ला
छाया सौजन्य- रॉयटर्स

काबुल : बुधवारी अफगाणिस्तानची राजधानी असणाऱ्या काबुल येथे एका बंदुकधारी इसमाने आणि आत्मघाती हल्लेखोरांनी धर्मस्थळ असणाऱ्या एका गुरुद्वाऱ्यावर हल्ला केला. त्यांनी हल्ला केला त्यावेळी या ठिकाणी जवळपास 200जण अडकल्याची माहिती समोर आली. सध्याच्या घडीला समोर आलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात 11हून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. 

काबुल येथील या हल्ल्याची माहिती मिळताच अफगाणिस्तानच्या संरक्षण दलातील जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आणि हल्लेखोरांना प्रत्युत्तर दिलं. अफगाणिस्तानमधील शीख समुदायाचे नेते खासदार नरिंद्र सिंग खालसा यांच्या माहितीनुसार या हल्ल्यानंतर परिसरात एकत गोंधळ आणि भीतीचं वातावरण पाहायला मिळालं. ISIS या संघटनेकडून या हल्ल्याची जबाबदारी घेण्यात आली.

सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार तीन आत्मघाती हल्लेखोरांनी धर्मशाळेत प्रवेश केला. तेथे सर्व श्रद्धाळू असतेवेळीच त्यातीच एका बंदुकधारी हल्लेखोराने हल्ला करण्यास सुरुवात केली. 

हल्ल्याचा निषेध 

महाराष्ट्र शीख असोसिएशय अर्थात एमएसए या संघटनेकडून काबुल येथे गुरुद्वारावर झालेल्या या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. 

 

हल्ल्याच्या वेळी नेमकं काय झालं? 

'अल जजीरा'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार मोहन सिंह या प्रत्यक्षदर्शींनी हल्ल्याच्या वेळची परिस्थिती सर्वांपुढे मांडली. बंदुकीच्या गोळ्या झाडल्याचा आवाज होताच घटनास्थळी असणाऱ्या मोहन सिंग यांनी एका टेबलखाली स्वत:ला लपवलं. त्यानंतर त्यांना स्फोटांचा आवाज झाला. त्यांच्या म्हणण्यामुसार हा आवाज ग्रेनेड हल्ल्याचा होता. घटनास्थळी सिलिंग पडल्यामुळे ते यामध्ये जखमी झाले. 

सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या काही फोटोमध्ये लहान मुलं सुरक्षा दलाच्या जवानांच्या मदतीने बाहेर येतानाा दिसत आहेत. यामधील काही मुलांच्या पायात चप्पलही नसून झाल्या प्रकारानंतर ती हादरलेली दिसून आली.