स्वर्गात पोहचवणाऱ्या 3 हजार 922 पायऱ्या; पृथ्वीवरील सर्वात थरारक ठिकाण

स्वर्ग ही रम्य कल्पना आहे. पण हवाईबेटांवर हायकू स्टेअर्स पाहून लोकांना स्वर्गाचीच आठवण येते. स्वर्गात जाणारा मार्ग वाटावा असा चार हजार पायऱ्या या ठिकाणी आहेत. या ठिकाणी जाण्यास बंदी असली तरी लोकं बंदी झुगारून हायकू स्टेअर्स चढण्याचा प्रयत्न करतात.

वनिता कांबळे | Updated: Apr 8, 2024, 12:10 AM IST
 स्वर्गात पोहचवणाऱ्या 3 हजार 922 पायऱ्या; पृथ्वीवरील सर्वात थरारक ठिकाण title=

Haiku Stairs Hawaii : डोंगराच्या निमुळत्या टोकावरुन जाणारी ही शिड्यांची पायवाट.  या आहेत स्वर्गात नेणाऱ्या पायऱ्या. हवाई बेटांवरील केनोही डोंगरावर ही हायकू स्टेअर्स म्हणजे पायऱ्या आहेत. स्वर्गाच्या या पायऱ्यांची संख्या जवळपास 3 हजार 922 एवढी आहे. या पायऱ्या चढून जाणं हे तसं आव्हान आहे. पण आजुबाजूचा निसर्ग आणि तिथलं वातावरण पाहता. स्वर्गाच्या वाटेवर एकदा जावंच असं प्रत्येकाला वाटतं. डोंगराच्या पायथ्यापासूनच्या या शिड्या मध्येच धुक्यात हरवतात. 

कधी कधी तर एखादा ढगच या पायऱ्यांवर विसावलेला दिसतो. तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की या पायऱ्या बांधल्या कुणी? या पायऱ्या बांधल्या अमेरिकन नेव्हीनं.  1940 साली दुसऱ्या महाय़ुद्धाच्या काळात या डोंगरावर एक रेडिओ स्टेशन बांधण्यात आलं. या रेडिओ स्टेशनद्वारे अमेरिकन नेव्हीकडून प्रशांत महासागरातल्या त्यांच्या जहाजांशी संपर्क प्रस्थापित केला जायचा. कालांतरानं हे रेडिओस्टेशन बंद करण्यात आलं. 

पण, या रेडिओस्टेशनपर्य़ंत जाणाऱ्या पायऱ्या लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला. 1970 साली दररोज जवळपास 75 पर्यटक या पायऱ्या चढून रेडिओ स्टेशनपर्यंत जायचे. पण नंतर 1978 साली य़ा पायऱ्यांवर जाण्यास तिथल्या प्रशासनानं बंदी घातली. पोलीस आणि पहारेकऱ्यांची नजर चुकवून रोज अनेक पर्यटक या स्वर्गाच्या वाटेवर जातात. 2016 मध्ये होनूलोलूच्या स्थानिक प्रशासनानं या पायऱ्या काढून टाकण्याचा निर्णय घेतला. 2022 पर्यंत ही स्वर्गाची वाट इतिहासजमा होणार आहे. त्यामुळं एक साहसी रस्ता कायमचा इतिहासजमा होणार आहे.

चीन मध्ये स्वर्गाचं दार !

स्वर्ग ही अशी संकल्पना आहे ज्या संकल्पनेचीच माणसाला कायम भुरळ पडत राहिलीय. मेल्यावर माणूस स्वर्गात जातो असं म्हणत असले तरी तुम्हाला जिवंतपणीच स्वर्गाचं दार पाहायचं असेल तर तुम्हाला एकदा तरी चीनच्या तियनमेन पर्वतरांगांमध्ये जावंच जागेल. चीनी भाषेत तियनमेनचा अर्थ स्वर्गाचं दार असाच होतो. चीनच्या हुनान प्रांतातल्या तियनमेन डोंगररांगांमध्ये स्वर्गाचं दार आहे. या डोंगररांगांमध्ये जाण्यासाठी जगातल्या सर्वात लांबीच्या म्हणजेच जवळपास साडेसात किलोमीटर लांबीच्या केबलकारनं जावं लागतं. 37 अंशाच्या कोनातून सरळ डोंगरमाथ्यावर जाण्याचा अनुभव अवर्णनीय असा असतो. तुम्हाला घाटरस्त्यानं जायचं असेल तर 11 किलोमीटरचा नागमोडी रस्ताही आहे. स्वर्गाचं दार म्हणवल्या जाणाऱ्या गुहेजवळ जवळपास पाच एकरवर मंदिर आहे. या मंदिराच्या पायऱ्या चढून जाणं मजेदार असतं. डोंगरमाथ्यावर पर्यटकांची पारदर्शक सज्जे तयार करण्यात आलेत. या सज्ज्यांवरून तुम्ही संपूर्ण परिसर न्याहाळू शकता. या भागात लोकांनी श्रद्धेनं लाल कापडी निशाणं झाडांना बांधलीयेत. या लाल कापडी निशाणांमुळे त्याच्या सौंदर्यात आणखी भर पडलीय. डोंगर माथ्यावरचा मंदिर परिसर तुम्हाला स्वर्गात आल्याची अनुभूती देतो. तियनमेन डोंगर रांगेला विशाल भोक पडलंय. त्या स्वर्गाच्या दारापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या बनवण्यात आल्यात. या भागातून हिरवागार परिसर डोळ्यात साठवता येतो. डोळ्याचं पारणं फेडणारं निसर्गसौंदर्य तुम्हाला स्वर्गाची अनुभूती देतं.