'आपल्या पतीची हत्या कशी करावी?' या पुस्तकाच्या लेखिकेच्या पतीचा खून कसा झाला?

अमेरिकेत एका लेखिकेला पतीच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे, या लेखिकेने 'आपल्या पतीची हत्या कशी करावी' या विषयावर एक कादंबरी लिहिली होती

Updated: May 26, 2022, 05:04 PM IST
'आपल्या पतीची हत्या कशी करावी?' या पुस्तकाच्या लेखिकेच्या पतीचा खून कसा झाला?  title=

अमेरिकेत एका लेखिकेला पतीच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे, या लेखिकेने 'आपल्या पतीची हत्या कशी करावी' या विषयावर एक कादंबरी लिहिली होती. नॅन्सी क्रैंप्टन ब्रोफी (वय 71) असं या महिलेचं नाव आहे. तिचा पती डॅनियल हा व्यावसायाने शेफ होता. 2018 मध्ये नॅन्सीने आपल्या पतीची गोळी मारून हत्या केली होती. या प्रकरणी ओरेगन राज्याच्या कोर्टाने नॅन्सीला 'सेकंड डिग्री मर्डर'अंतर्गत दोषी ठरवले आहे.   

पोलिसांनी सांगितल्यानुसार, पीडित डॅनियल ब्रोफी (वय 63) याच्यावर दोन वेळा गोळी झाडण्यात आली होती. त्याचा मृतदेह त्याच्या विद्यार्थ्यांना सापडला होता. विम्याच्या पैशांसाठी पतीचा खून केल्याचा संबंधित खटल्यातील वकिलांनी दावा केला होता. डॅनियलच्या मृत्यूनंतर नॅन्सीला विम्याच्या रक्कमेचे सुमारे 11 कोटी रुपये मिळाले असते. पीडिताच्या वकिलांनी नॅन्सीच्या बंदुकीचे अनेक पार्ट हस्तगत केले आहेत. नॅन्सीजवळी सापडलेले बंदुकीचे तुकडे आणि विम्याची रक्कम, हेच एकमेव कारण डॅनियलच्या हत्येचं असल्याचं वकिलांनी म्हटलं आहे.     

पुस्तकासाठी बंदुकीचे तुकडे गोळा केले

दुसरीकडे, कादंबरीसाठी बंदुकीचे तुकडे  गोळा केल्याचा दावा नॅन्सीच्या वकिलांनी केला आहे. नॅन्सी एक पुस्तक लिहित आहे. त्यात अत्याचारी पतीला मारण्यासाठी पत्नी बंदुकीचे छोटे-छोटे तुकडे हळूहळू गोळा करते. याचा अनुभव घेण्यासाठी नॅन्सीनेही बंदुकीचे तुकडे गोळा केल्याचा दावा नॅन्सीच्या वकिलांनी केला आहे. नॅन्सी आणि डॅनियल या दोघांमध्ये अतिशय प्रेम होतं. गेल्या 25 वर्षांपासून पती-पत्नी प्रेम आणि आनंदाने संसार करत होते, असं नॅन्सीच्या वकिलांनी सांगितलं. या निर्णयाला आव्हान देणार असल्याचंही ते पुढे म्हणाले.   

शेफ पतीची किचनमध्ये हत्या

डॅनियल ब्रोफी ओरेगन कल्नरी इन्स्टिट्यूटमध्ये 2006 सालापासून शेफ म्हणून काम करत होते. 2 जून 2018 मध्ये त्यांची किचनमध्ये गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. डॅनियलचे विद्यार्थी घटनास्थळी पोहोचताच त्यांना धक्का बसला. त्यांनी डॅनियलचा मृतदेह खाली उतरवला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येच्या ठिक अर्धा तास आधी नॅन्सीला ओरेगन इंन्स्टिट्यूटमध्ये येताना पाहिलं होतं. सीसीटीव्हीमध्येही हे रॅकॉर्ड झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. मात्र, इंन्स्टिट्यूटमध्ये गेल्याचं मला आठवत नाही; असं नॅन्सीने कोर्टात सांगितलं.