मुंबई : अफगाणिस्तानवर तालिबानने आता पूर्णपणे कब्जा केला आहे. त्यानंतर अफगाणिस्तानातून येणारे फोटो आणि व्हिडिओ अत्यंत धक्कादायक आहेत. आता मिळालेल्या माहितीनुसार काबूलमध्ये एका बागेत लपलेल्या शेकडो महिला बेपत्ता झाल्याचा दावा करण्यात येत आहे. दिल्लीत राहणाऱ्या एका अफगाण वंशाच्या नागरिकाचे म्हणणे आहे की, शहराच्या प्रसिद्ध शहर-ए-नवा बागेमध्ये उपस्थित असलेल्या महिलांनी अफगाण सैनिक आणि तालिबानी दहशतवाद्यांमधील युद्धापासून वाचण्यासाठी गाव सोडले होते.
अफगाणिस्तानमधील या नागरिकाने स्वतःची ओळख लपवत सांगितलं की, 'मी पूर्ण जबाबदारीने सांगत आहे की, बागेत लपलेल्या शकडो महिला आता बेपत्ता झाल्या आहेत. बेपत्ता महिलांचे नातेवाईक त्यांना शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. पण अद्यापही त्या बेपत्ता आहेत. मी आठ वर्षांपूर्वी देश सोडला, तरीही माझ्याकडे अनेक महत्त्वाचे स्रोत आहेत जे संपूर्ण अफगाणिस्तानची ठोस बातमी देतात. '
ते म्हणाले की, 'बॉम्बस्फोट, गोळीबार आणि हवाई हल्ले अफगाणिस्तानच्या लोकांसाठी नवीन नाहीत, कारण आम्हाला लहानपणापासूनच त्याची सवय होती. आमच्याकडे तरूणांचे प्राण कायम धोक्यात आसतात. खास करून महिला आणि तरूणमुलींचे. कारण तालिबानी बळजबरीने महिलांना आणि मुलींना घरातून उचलून नेतात.'
गेल्या अनेक वर्षांपासून ही परिस्थिती आहे. तरी देखील सरकार कोणत्याही प्रकारची कारवाई करत नसल्याचा सूर अफगाणिस्तानमधील नागरिकांनी आवळला आहे. एका न्यूज एजेन्सीला त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ' शहार-ए-नवा बागेतून शेकडो मुली अचानक गायब झाल्या आहेत, त्यासाठी कोणाला जबाबदार धरावे?' असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले, 'तलिबानने पूर्ण देशावर कब्जा केला आहे. लोक देश सोडून जात आहेत, यासाठी राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांना जबाबदार धरले पाहिजे. हे सर्व एका रात्रीत घडले नाही, त्यांनी देशातील सर्व प्रांत ताब्यात घेतले आणि अफगाणिस्तान सरकार गप्प राहिले असल्याचं अफगाणिस्तानमधील नागरिकाने सांगितलं आहे.