UN मध्ये दुर्मिळ घटना! भारताने पाकिस्तानला दिला पाठिंबा; 'हे' आहे खास कारण

India backs Pakistan in UN: भारताने संयुक्त राष्ट्रांच्या (United Nations) मानवाधिकार परिषदेत (Human Rights Council) पाकिस्तानला (Pakistan) पाठिंबा दिला आहे. स्वीडनमध्ये (Sweden) वारंवार इस्लाममधील पवित्र धर्मग्रंथ कुराणची (Quran) जाळपोळ केली जात असून, याविरोधात पाकिस्तानने परिषदेत प्रस्ताव मांडला. यावेळी भारताने पाकिस्तानच्या समर्थनार्थ मतदान केलं.   

शिवराज यादव | Updated: Jul 13, 2023, 12:08 PM IST
UN मध्ये दुर्मिळ घटना! भारताने पाकिस्तानला दिला पाठिंबा; 'हे' आहे खास कारण title=

India backs Pakistan in UN: संयुक्त राष्ट्रांच्या (United Nations) मानवाधिकार परिषदेत  (Human Rights Council) दुर्मिळ प्रकार पाहण्यास मिळाला आहे. एकमेकांचे कट्टर विरोधक असतानाही भारताने पाकिस्तानची साथ दिली आहे. झालं असं की, स्वीडनमध्ये (Sweden) वारंवार इस्लाममधील पवित्र धर्मग्रंथ कुराणची (Quran) जाळपोळ केली जात असून, याविरोधात पाकिस्तानने परिषदेत प्रस्ताव मांडला. यावेळी भारताने पाकिस्तानच्या समर्थनार्थ मतदान केलं. भारताने पाकिस्तानला पाठिंबा देण्याची ही फार दुर्मिळ घटना आहे.  

सर्व इस्लामिक देशांसह युरोपीय संघ, पोप फ्रान्सिस आणि स्वत: स्वीडन सरकारने या घटनांचा निषेध केला होता. पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र परिषदेत प्रस्ताव मांडताना कुराण जाळण्यासारख्या घटनांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. पण अमेरिका आणि युरोपियन युनियनसह अनेक पाश्चिमात्य देशांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दाखला देत या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केलं. 

47 पैकी 12 देशांकडून पाकिस्तानच्या प्रस्तावाचा विरोध

UNHRC मध्ये एकूण 47 सदस्य आहेत. यामधील OIC म्हणजेच ऑर्गेनाइजेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनमध्ये फक्त 19 देश सहभागी आहेत. या सर्वांनी पाकिस्तानचं समर्थन केलं आहे. पाकिस्तानने ओआयसीने दिलेल्या सल्ल्यानुसारच UNHRC मध्ये प्रस्ताव मांडला होता. पाकिस्तानला नेहमी समर्थन देणाऱ्या चीननेही प्रस्तावाला पाठिंबा दिला. दुसरीकडे, नेपाळसह 7 देशांनी मतदान न करता तटस्थ भूमिका घेतली. 

UNHRC मध्ये प्रस्ताव मांडण्यात आल्यानंतर त्यावर चर्चा पार पडली. यावेळी कुराण जाळण्यासारख्या घटना द्वेष वाढवण्याचं काम करत आहेत असं मुस्लीम देशांनी सांगितलं. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अशा घटना वाढू देऊ शकत नाही असाही विरोध त्यांनी दर्शवला. या प्रस्तावाविरोधात 12 देशांनी विरोध केला. ज्यामध्ये ब्रिटन, बेल्जियम, जर्मनी, रोमानिया, लिथुआनिया, कोस्टारिका आणि फिनलँड या देशांचा समावेश आहे. 

स्वीडनमध्ये ईदला जाळण्यात आलं होतं कुराण

स्वीडनमध्ये ईदच्या दिवशी एका व्यक्तीने मशिदीच्या बाहेर कुराण जाळत आंदोलन केलं होतं. यासाठी त्याने स्वीडन सरकारकडून परवानगी घेतली होती. CNN च्या वृत्तानुसार, अभिव्यक्ती स्वातंत्र्याअंतर्गत त्याला एक दिवसाच्या आंदोलनासाठी परवानगी देण्यात आली होती. या आंदोलनात एकच व्यक्ती आपल्या दुभाषिकासह सहभागी झाला होता. 

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, आंदोलन करणाऱ्या व्यक्तीने कुराणची काही पानं फाडली आणि त्यांना आग लावली. यानंतर त्याने स्वीडनचा झेंडाही फडकावला होता. आंदोलन पाहणाऱ्या 200 लोकांमधील काहीजणांनी त्याला पाठिंबा दिला, तर काहींनी त्याच्याविरोधात घोषणा दिल्या. यामधील एका व्यक्तीने अरब भाषेत 'गॉड इज ग्रेट' ओरडत आंदोलन करणाऱ्या व्यक्तीवर दगड भिरकावला. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं.