चीन की भारत ? संघर्षाची वेळ आली तर रशिया कोणाला साथ देणार

आशिया खंडामध्ये चीन आणि भारत हे दोन मोठे देश आहेत. ज्यांना इतर देश अधिक महत्त्व देतात.

Updated: Mar 30, 2022, 08:17 PM IST
चीन की भारत ? संघर्षाची वेळ आली तर रशिया कोणाला साथ देणार title=

India and Russia : रशियाने २४ फेब्रुवारी रोजी युक्रेनवर हल्ले सुरू केले. आज एक महिन्यानंतर ही रशियन आक्रमण सुरूच आहे. युक्रेनला उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्याचे अनेक देशांचे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. रशिया आणि युक्रेनमध्ये चर्चा होऊन ही कोणताही तोडगा निघालेला नाही. दरम्यान, भारताने आपली भूमिका तटस्थ ठेवली आहे. यावरून काही देशांनी भारतावर टीकाही केली आहे. भारताने अतिशय विचारपूर्वक हा निर्णय घेतल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

रशियाला पाठिंबा देणारा चीन एकमेव देश

युक्रेन हल्ल्यात रशियाला ज्या प्रकारे चीनची साथ मिळाली, त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) युक्रेनवर हल्ला (Ukraine attack) होण्यापूर्वीच चीनला गेले होते. तेथे त्यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग (Xi Jinping) यांच्याशी विस्तृत चर्चा केली. दोन्ही नेत्यांचे संयुक्त निवेदन जारी करण्यात आले. पुतिन यांनी जिनपिंग यांना युक्रेनसंदर्भातील त्यांच्या योजनेची माहिती दिली असावी, असे मानले जात आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याकडे चीनने डोळे बंद केले आहेत. जिनपिंग यांच्याकडून पुतिन यांना हीच अपेक्षा असेल.

भारताचे चीनसोबतचे संबंध बिघडले तर रशिया भारताला साथ देईल का, हा प्रश्न आहे. वास्तविक, रशिया हा भारताचा असा मित्र आहे, ज्याने भारताला अनेक कठीण काळात मदत केली आहे. 1971 च्या पूर्व पाकिस्तानातील युद्धात, रशियन नौदलाने यूएस सातव्या फ्लीट टास्क फोर्स 74 ला बंगालच्या उपसागरात जाण्यापासून रोखले. या लढतीत भारताचा निर्णायक विजय झाला. रशिया हा भारताला सर्वाधिक संरक्षण उपकरणे देखील पुरवतो.

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर जगातील राजकीय समीकरण बदलली आहेत. भारत आणि चीनमध्ये संघर्ष (Conflict between India and China) झाल्यास रशिया भारताला साथ देऊ शकतो. रशिया हा भारताला पाठिंबा देत राहील, याचे कारण भावनिक किंवा जुने संबंध नसून असे करणे रशियाच्या स्वतःच्या हिताचे आहे.

जागतिक शक्ती संतुलनाच्या दृष्टीने भारत रशियासाठी खूप महत्त्वाचा आहे. सध्या जगात ज्या दोन मोठ्या शक्तींमध्ये सर्वाधिक शत्रुत्व आहे ते म्हणजे अमेरिका आणि चीन. पाश्चिमात्य देश भारताला ज्या नजरेने पाहतात त्याचप्रमाणे रशिया भारताकडे पाहतो. याचा अर्थ आशियामध्ये चीनला नियंत्रणात ठेवणे. यामध्ये भारताची भूमिका सर्वात मोठी आहे. एकप्रकारे चीनच्या वाढत्या सामर्थ्याला आळा घालण्यासाठी रशिया आणि पाश्चात्य देशांजवळ भारताला पाठिंबा देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.