भारत आणि अमेरिकेचा संयुक्त युद्धाभ्यास, पाकिस्तान आणि चीनला भरली धडकी

भारत आणि अमेरिकेचा संयुक्त युद्धाभ्यास

Updated: Feb 15, 2021, 09:08 PM IST
भारत आणि अमेरिकेचा संयुक्त युद्धाभ्यास, पाकिस्तान आणि चीनला भरली धडकी

नवी दिल्ली : बिकानेरमध्ये सध्या भारत आणि अमेरिकेचा संयुक्त युद्धाभ्यास सुरू आहे. सीमेच्या अगदी जवळ होणाऱ्या या अभ्यासामुळे पाकिस्तान आणि त्याचा पाठिराखा असलेल्या चीनला धडकी भरली आहे. राजस्थानच्या बिकानेरमध्ये पाकिस्तानच्या सीमेला लागून भारत आणि अमेरिकेचा संयुक्त युद्धाभ्यास सुरू आहे. या युद्धाभ्यासाचं सामरिक महत्त्व आहेच, पण भौगोलिकदृष्ट्याही तो महत्त्वाचा ठरतो आहे.

वाळवंटामध्ये दोन्ही देशांच्या फौजा आपलं कसब अधिकाधिक वाढवताना दिसत आहेत. भारत आणि अमेरिकेचे जवान एकमेकांची आयुधं हाताळतायत. भारताच्या सारथ या रणगाड्यातून अमेरिकन सैनिक हल्ला चढवतात तर अमेरिकेच्या स्ट्रायकर टँकमधून भारतीय जवान टार्गेट टिपत आहेत.

भारताचे रणगाडे अवजड अशा चेनवर तर अमेरिकेचे रणगाडे टायर ट्यूबवर चालतात. वरवर पाहता दोन्ही देशांची हत्यारं सारखीच दिसत असली, तरी त्यात बराच फरक आहे. अधिक खोलवर जाऊन बघितल्यावर मात्र अमेरिकी हत्यारांना जगात एवढी मागणी का आहे, त्याचं उत्तर मिळतं.

या युद्धाभ्यासाचा मुख्य उद्देश एकमेकांची युद्धकौशल्य शिकण्याचा आहे. भारत आणि अमेरिका एकत्रितरित्या एखादं युद्ध कसं हाताळू शकतील, याची चाचपणीही यात केली जाते. त्यामुळेच हत्यारांची आदलाबदली करून हा सराव केला जातो. त्याबरोबरच एकमेकांकडे असलेलं युद्धविषयक तंत्रज्ञान शिकण्याचाही उद्देश यातून सफल होतो. 

भारताचे जवान अमेरिकेच्या तोडीस तोड असल्याचं या युद्धाभ्यासात दिसतंय. दुसरीकडे अमेरिकेच्या सैनिकांनाही यातून बरंच काही शिकता येतंय. 30 अंश तापमान असताना शुष्क वाळवंटात लढणं अमेरिकेच्या सैनिकांसाठी आव्हानात्मक आहे. 

दिवसभर युद्धाचं प्लॅनिंग, अॅक्शन केल्यानंतर संध्याकाळी दोन्ही देशांचे जवान खेळाच्या मैदानातही एकत्र दिसतात. एका टीममध्ये अर्धे भारतीय आणि अर्धे अमेरिकन सैनिक असतात. यातून सैनिकांमध्ये मैत्रीचे संबंध वाढीस लागतात... 

बिकानेरच्या महाजन फिल्ड फायरिंग रेंजमध्ये दिवस-रात्र हा युद्धाभ्यास सुरू आहे. एका महिन्यात राजस्थानमधला हा दुसरा मोठा युद्धाभ्यास आहे. यापूर्वी 21 दिवस भारत आणि फ्रान्सच्या सेनांनीही असाच सराव केलाय. या युद्धाभ्यासाची दृष्य भारतीयांना अभिमान वाटावा अशीच आहेत. मात्र पाकिस्तानच्या सीमेच्या इतक्या जवळ धडाडणाऱ्या या तोफांनी पाकिस्तान आणि चीनला मात्र धडकी भरलीये.