Covid-19 Vaccine: भारत मित्र राष्ट्रांनंतर आता 'या' देशांना पुरवणार लस

16 जानेवारीपासून भारतात लसीकरणाला सुरूवात झाली आहे. 

Updated: Feb 18, 2021, 08:07 AM IST
Covid-19 Vaccine: भारत मित्र राष्ट्रांनंतर आता 'या' देशांना पुरवणार लस  title=

नवी दिल्ली : गेल्या वर्षापासून कोरोना व्हायरसने देशातच नाही तर संपूर्ण जगात हाहाःकार माजवला आहे. अद्यापही कोरोना सावट दूर झालं नाही. पण या महामारीवर मात करण्यासाठी अनेक राष्ट्रांमध्ये लसीकरण मोहिम सुरू करण्यात आली आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात भारताने शेजारील राष्ट्रांना आणि मित्र देशांना 64 लाख लसी अनुदानाच्या रूपात दिल्या आहेत. भारत आता पुढील टप्प्यात आफ्रिकन, कॅरीकॉम, लॅटिन अमेरिकन आणि पॅसिफिक बेटांच्या देशांना लस पाठवणार आहे.

जानेवारी महिन्यात भारताने 20 पेक्षा जास्त शेजारच्या आणि मित्र देशांना तब्बल 229 लाख कोरोना लस पाठवल्या होत्या. भारताकडून अनेक राष्ट्रांना मदतीच्या रूपाने किंवा व्यवसायी स्वरूपात लस पाठवण्याचं अभियान सुरू आहे. त्यामुळे या अभियानास 'टीका मैत्री' असं नाव देण्यात आलं आहे. 

भारतात 16 जानेवारीपासून लसीकरणाची मोहिम सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर, विविध देशांत 'टीका मैत्री' अभियान राबविण्यात आले. गेल्या आठवड्यांत भारतात तयार होणार्‍या लक्षावधी लसी भूतान, म्यानमार, नेपाळ, बांग्लादेश, श्रीलंका, मॉरिशस, सेशल्स येथे पोचविल्या गेल्या आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत कोरोना लस आफ्रिकन देश, लॅटिन अमेरिका, कॅरीकॉम आणि पॅसिफिक बेटांच्या देशांत पाठविली जाईल. कोरोना साथीविरूद्ध लढा देणं हे भारताचं आंतरराष्ट्रीय कर्तव्य आहे. त्यामुळे आम्ही इतर देशांना लसी देण्याचा प्रयत्न करीत आहोत. असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात मांडलं होतं, असं वक्तव्य परराष्ट्रा मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने केलं.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या मंदावली होती. पण आता पुन्हा रूग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे धोका वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन करण्याची शक्यता आहे.