VIDEO: खलिस्तानी समर्थकांकडून भारतीय राजदूतांना धक्काबुक्की; शीख बांधवांनी डाव पाडला हाणून

Gurpatwant Singh Pannu : अमेरिकेतील एका गुरुद्वारात भारतीय राजदूतांना धक्काबुक्की करण्यात आली आहे. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. मात्र तिथल्या शीख बांधवांनी हा डाव हाणून पाडला आहे.

आकाश नेटके | Updated: Nov 27, 2023, 01:11 PM IST
VIDEO: खलिस्तानी समर्थकांकडून भारतीय राजदूतांना धक्काबुक्की; शीख बांधवांनी डाव पाडला हाणून title=

Gurpatwant Singh Pannu : खलिस्तान समर्थक हरदीप सिंग निज्जरच्या ( Hardeep Singh Nijjar) हत्या प्रकरणावरुन भारत आणि कॅनडाचे संबंध गेल्या काही दिवसांपासून ताणले गेले आहेत. कॅनडाचे राष्ट्राध्यक्ष जस्टिन ट्रूडो यांनी भारतावर खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची हत्या केल्याचा आरोप केला होता. मात्र, हा आरोप सिद्ध करण्यासाठी कॅनडाकडून कोणताही पुरावा सादर करण्यात आला नाही. दुसरीकडे खलिस्तानच्या समर्थकांकडून (Khalistani supporters) कॅनडामध्ये भारतीयांवर अत्याचार सुरु आहेत. खलिस्तान समर्थक भारतीय अधिकाऱ्यांनाही लक्ष्य करताना दिसत आहेत. आता पुन्हा एकदा खलिस्तानी नेता गुरपतवंत सिंग पन्नू याच्या समर्थकांनी भारताच्या राजनैतिक अधिकाऱ्यासोबत धक्काबुक्की केली आहे.

भारताविरोधात सातत्याने गरळ ओकणारा खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने यावेळी त्याच्या समर्थकांच्या माध्यमातून घृणास्पद कृत्य केलं आहे. पन्नूने त्याच्या समर्थकांना न्यूयॉर्कमधील गुरुद्वारात (New York gurdwara) पाठवले आणि भारतीय राजदूत तरनजीत सिंग संधू यांना धक्काबुक्की करायला लावली. याआधी ब्रिटनमध्येही खलिस्तानी समर्थकांनी गुरुद्वाराबाहेर भारतीय राजदूतांशी अशाच प्रकारे गैरवर्तन केले होते. मात्र पन्नूच्या शिख फॉर जस्टिस या संघटनेचा भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधू यांना मारहाण करण्याचा डाव फसला आहे. 

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील गुरुद्वारामध्ये गुरुपुरवनिमित्त खलिस्तानींनी भारतीय राजदूतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तरनजीत सिंग संधू हे गुरुद्वारात आले होते. मात्र तिथे उपस्थित असलेल्या पन्नूच्या समर्थकांनी संधू यांना धक्का देण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या प्रकाराचा एक व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडीओमध्ये खलिस्तानी समर्थक, तुम्ही हरदीप सिंह निज्जरची हत्या केली आणि आता तुम्ही पन्नूला मारण्याची योजना आखत आहात, असे म्हणताना दिसत आहेत. हिम्मत सिंग नावाच्या खलिस्तान समर्थकाने राजदूत संधू यांच्याशी गैरवर्तन केले आणि हरदीप सिंग निज्जर यांच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप केला.

या सगळ्या प्रकारानंतर तिथे उपस्थित असेलल्या शीख बांधवांना खलिस्तानी समर्थकांचा हा डाव हाणून पाडला. एवढेच नाही तर या शीखांनी भारतीय राजदूतांचा सन्मान केला. संधू यांचे गुरुद्वारामध्ये शीख समुदायाच्या लोकांनी जोरदार स्वागत केले. या कार्यक्रमादरम्यान, संधू यांनी अफगाणिस्तानातून शिखांच्या सुरक्षित स्थलांतराचा उल्लेख केला आणि सरकार नेहमीच त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे सांगितले.