Bank Holiday in November: नोकरदार वर्गासाठी काही गोष्टींचं अनन्यसाधारण महत्त्वंच असतं. याच महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक म्हणजे पगार. काही कंपन्यांमध्ये महिन्यांच्या शेवटच्या दिवशी, तर काही कंपन्यांमध्ये महिन्याच्या पहिल्या दिवशी कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार जमा केला जातो. नोव्हेंबर महिन्याच्या पगाराबाबत मात्र अनेकांच्याच मनात संभ्रमाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
महिनाअखेर आला की अनेकांनाच प्रतीक्षा असते ती म्हणजे नव्या महिन्याच्या सुरुवातीला किंवा चालू महिन्याच्या अगदी शेवटच्या दिवशी येणाऱ्या पगाराची. मुळात कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार केव्हा जमा होणार याचे सर्व निर्णय कंपनीच्या पगाराविषयीच्या धोरणांवर आधारित असून, ते संस्थांनुसार बदलू शकतात.
काही कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांच्या खात्यात महिन्याच्या 30 तारखेला पगार जमा केला जातो. तर, काही कंपन्यांकडून 7 तारखेला किंवा 10 तारखेला पगार जमा केला जातो. कैक कंपन्या महिन्याच्या पहिल्याच दिवशी अर्थात 1 तारखेलाही Salary Credit करतात. यंदाच्या वर्षी 30 नोव्हेंबर आणि 7 डिसेंबर या दोन्ही दिवशी शनिवार असल्यामुळं अनेक कर्मचाऱ्यांना आपला पगार नेमका कधी होणार हाच प्रश्न पडला आहे.
पगार खात्यात कधी जमा होणार हे जाणून घेण्याआधी कर्मचाऱ्यांना त्यांच्या पेरोल प्रोसेसिंग सायकलसंदर्भात माहिती असणं अपेक्षित आहे. यंदाच्या वर्षात 30 नोव्हेंबरला शनिवार आहे हे खरं. सहसा कोणत्याही महिन्याच्या दुसऱ्या आणि चौख्या शनिवारी बँकांना रजा असते. पण, 30 तारखेला येणारा शनिवार हा महिन्यातील पाचवा शनिवार असून, या कारणास्तव बँकांचं कामकाज सुरू राहणार आहे. त्यामुळं ज्या कंपन्यांमध्ये महिन्याच्या शेवटी पगार खात्यात जमा होतो त्या सर्व कंपन्या निर्धारित वेळेमध्येच पगार देणार आहेत.
काही कंपन्या मात्र इथं अपवाद ठरतील. कारण, धोरणांनुसार या कंपन्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी कर्मचाऱ्यांचा पगार जमा करतात आणि कैक कंपन्यांसाठी 29 नोव्हेंबर अर्थात शुक्रवार हाच तो दिवस असल्यामुळं हा पगार शुक्रवारीसुद्धा जमा होऊ शकतो. महिन्याच्या पहिल्या तारखेला पगार देणाऱ्या कंपन्यांचा पगार या महिन्यात एक दिवस पुढे अर्थात 2 डिसेंबरला म्हणजेच सोमवारी होणार असल्यामुळं या कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा मात्र वाढणार आहे.