निर्दोष असूनही कतारमध्ये शिक्षा भोगतंय मुंबईतील दाम्पत्य

कारागृहातच दिला मुलीला जन्म  

Updated: Oct 24, 2020, 10:53 AM IST
निर्दोष असूनही कतारमध्ये शिक्षा भोगतंय मुंबईतील दाम्पत्य

मुंबई : कतारमध्ये मुंबईतील एक दाम्पत्य काही कारणनसून शिक्षा भोगत आहे. त्यामुळे त्यांची सुटका करण्यासाठी केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) प्रयत्न सुरू केले आहेत. या दाम्पत्याला काकीकडून लग्नाची भेट म्हणून कतारचे हनीमून पॅकेज मिळाले. कतारमध्ये आनंद साजरा करण्यासाठी गेलेल्या दाम्पत्याच्या पर्सलमध्ये ४ किलो चरस कतार विमानतळावर आढळले. त्यामुळे त्यांना १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. याचदरम्यान दाम्पत्याने कारागृहातच मुलीला जन्म दिला. मुंबईच्या या निर्दोष दाम्पत्याचं नाव मोहम्मद शरीक कुरेशी आणि त्याच्या पत्नीचे नाव ओनिबा कुरेशी असं आहे. 

मात्र तब्बल १ वर्षानंतर या गुन्ह्याचा पर्दाफाश झाला आहे. त्यामुळे त्यांची सुटका करण्यासाठी केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) प्रयत्न सुरू केले आहेत. ६ जुलै रोजी कतारच्या दोहा विमानतळावर ४ किलो चरससह या दाम्पत्याला पकडण्यात आलं होतं. यानंतर त्यांना १० वर्षांची शिक्षा देखील सुनावली गेली. या कालात ओनिबा ३  महिन्यांची गर्भवती होती. कारागृहात जन्मलेली चिमुकली आता १ वर्षांची आहे. 

सदर घटनेची माहिती कुटुंबीयांना कळताच ओनिवाच्या वडील शकिल अहमद कुरेशी यांनी  २७ सप्टेंबर रोजी आपल्या मुलीला आणि जावयाला याप्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याची तक्रार एनसीबीला दिली. शकील यांनी नातेवाईक तबसुम रियाज कुरेशी आणि तिचा साथीदार निझाम कारा यांच्यावर संशय व्यक्त केला. 

तबसुबने त्यांना लग्नाची भेट म्हणून दाम्पत्याला हनिमून पॅकेज दिले. शिवाय कतारमध्ये राहणाऱ्या नातावाईकास देण्यासाठी एक पार्सल देण्यात आल्याचं देखील शकिल यांनी तक्रारीत नमुद केले होते. त्याचप्रमाणे कतारमध्ये नवीन सिम विकत घ्यावा लागणार म्हणून दोघांनी आपले फोन घरीच ठेवले होते. 

मोबाईलमध्ये तबसुम आणि निझाम यांच्यातील संवादाचे रेकॉर्डिंग कुरेशी यांनी एनसीबीकडे सोपावले. कुरेशी यांनी दिलेल्या पुराव्याच्या आणि तक्रारीच्या आधारे एनसीबीचे क्षेत्रीय उपसंचालक के.पी,एस. मल्होत्रा यांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. अतासध्या एनसीबी पथक कतार दुतावासाच्या मदतीने या दाम्पत्याच्या सुटकेसाठी प्रयत्न करत आहेत.