भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनिता विलियम्स (Sunita Williams) आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनमध्ये (International Space Station) अडकल्या असून ही आपली आनंदी जागा असून, येथे राहणं आपल्याला आवडतं असं म्हणाल्या आहेत. सुनिता विलियम्स आणि त्यांचे सहकारी बॅरी विल्मोर आठ दिवसांसाठी बोईंग स्टारलायनरच्या चाचणी मोहिमेसाठी अंतराळात गेले होते. परंतु, त्यांना अंतराळात जाऊन आता दोन महिने उलटले असले तरी परतलेले नाहीत. यानात बिघाड झाल्यामुळे त्यांच्या परतीच्या मार्गात अडचणी निर्माण झाल्या असून आता त्यांना फेब्रुवारी 2025 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. आठ दिवसांचा त्यांचा प्रवास आता आठ महिन्यांपर्यंत लांबला आहे. स्टारलायनरमध्ये काही तांत्रिक बिघाड झाले असून, गेल्या आठवड्यात त्यांच्याविना ते पृथ्वीवर परतले आहे.
"बिजनेसमध्ये अशाच प्रकारे गोष्टी होत असतात," असं सुनिता विलियम्स यांनी अतंराळातून घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. सुनिता विलियम्स यांनी आम्हा दोघांना आधीचा अनुभव असल्याने येथे स्टेशनमधील आयुष्य तितकं कठीण नाही असंही म्हटलं. "ही माझी आवडती जागा असून, येथे स्पेसमध्ये राहणं आवडतं," असं त्या म्हणाल्या.
"आम्हाला स्टारलायनरला पूर्णत्वाला न्यायचं असून पुन्हा एकदा जमिनीवर लँड करायचं आहे. पण अनेकदा तुम्हाला पुढील संधीसाठी वाट पाहावी लागते," असं सुनिता विलियम्स यांनी सांगितलं. सुनिता विलियम्स आणि विल्मोर फेब्रुवारी 2025 मध्ये एलॉन मस्क यांच्या स्पेस एक्समधील क्रू-9 च्या यानातून परतणार आहेत.
यावेळी सुनिता विलियम्स यांनी आपण लवकर घरी परतू शकत नसल्याचं फार वाईट वाटत असल्याचंही मान्य केलं. "मनात कुठेतरी कुटुंबाप्रमाणे काहीजण माझी वाट पाहत आहेत हीदेखील भावना आहे. माझ्या आईसह वेळ घालवण्यासारख्या गोष्टी आहेत. मला वाटतं मला त्याची जास्त चिंता आहे. आम्ही या हिवाळ्यात काही गोष्टींचं नियोजन केलं होतं. पण सर्वजण सोबत असल्याने मनाची तयारी झाली," असं त्या म्हणाल्या.
विल्मोर यांनी यावेळी स्पेसमध्ये राहण्याच्या निर्णयाची आपल्याला कोणतीही खंत नसल्याचं सांगितलं. तसंच पुन्हा कसं परतायचं यावरुन दुमत असल्याचंही मान्य केलं. "मला वाटतं आम्ही एका क्षणापर्यंत पोहोचू शकलो असतो. आम्ही स्टारलायनरकडे परतू शकत होतो. पण आम्हाला वेळ कमी पडला," असं ते पत्रकार परिषदेत म्हणाले. यादरम्यान आम्हाला काही गोष्टी आढळल्या आहेत ज्यामध्ये आम्ही फार निवांत होऊ शकत नाही असंही ते म्हणाले.
तसंच सुनिता विलियम्स आणि विल्मोर हे अंतराळातून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचा निवडणुकीसाठी मतदान करणार आहेत. विल्मोर यांनी आपण बॅलटसाठी विनंती केल्याचं सांगितलं आहे. अमेरिकेचे नागरिक म्हणून हे फार महत्त्वाचं असून, नासाने आमच्यासाठी ते सहज केलं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.