मुंबई : अनेक देश सध्या महागाईचा सामना करत आहेत. अनेक देशांना याचा मोठा फटका बसला आहे. यामध्ये जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटन सारख्या देशाचा ही समावेश आहे. एकीकडे बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्यानंतर ब्रिटन नव्या पंतप्रधानाच्या शोधात असून जगभरात त्याची चर्चा होत आहे. दुसरीकडे, येथील आणखी एका समस्येकडे माध्यमांचे लक्ष वेधले आहे. ब्रिटनमध्ये महागाई वाढून 9% झाली आहे. त्यामुळे तेथे शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे.
विद्यार्थ्यांपुढे आता संकटं झपाट्याने वाढत आहे. हे विद्यार्थी भाडे देखील भरु शकत नाहीयेत. आतापर्यंत जे विद्यार्थी नातेवाईकांच्या घरी राहत होते, त्यांनीही वाढत्या महागाईमुळे शिक्षण सोडून दिले असून, बहुतांश ठिकाणी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. अशा स्थितीत काही विद्यार्थ्यांना रस्त्यावर झोपावे लागत आहे.
12 टक्के विद्यार्थ्यांना छत नाही
स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, विद्यार्थी आता पार्ट टाइम जॉब शोधत आहेत. जेणेकरून ते या समस्येतून बाहेर पडू शकतील. सध्या या संकटानंतर, सुमारे 12 % विद्यार्थी असे आहेत की त्यांच्याकडे डोक्यावर आता छप्पर नाही. हायर एज्युकेशन पॉलिसी इन्स्टिट्यूट (HEAP) मध्ये प्रकाशित नॅशनल युनियन ऑफ स्टुडंट्स इन स्कॉटलंडने केलेल्या सर्वेक्षणात हा धक्कादायक खुलासा झाला आहे.
वाढत्या महागाईमुळे विद्यार्थी हैराण
एकीकडे उष्णतेने हैराण केले असतानाच आता छत गेल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. अन्न आणि विजेच्या वाढलेल्या किमतींचा सर्वाधिक फटका विद्यापीठात शिकण्यासाठी शहरात राहणाऱ्या इतर देशांतील विद्यार्थ्यांना बसत आहे. एवढ्या मोठ्या समस्येतून आपण जात आहोत, मात्र विद्यापीठाकडून योग्य ती व्यवस्था केली जात नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.