Titanic : 'टायटॅनिक'... भव्यतेची परिभाषा बदलून पहिल्याच प्रवासात जसलसमाधी मिळालेल्या या जहाजाविषयी आजवर अनेक गोष्टी लिहिल्या आणि बोलल्या गेल्या. गतकाळात घडलेल्या एका भयावह अपघातात या जहाजानं समुद्राचा तळ गाठला आणि त्यातून प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांनाही जलसमाधी मिळाली. पुढं टायटॅनिकचा प्रवास आणि त्याच्याशी संबंधित अनेक गोष्टी संग्रही ठेवल्या गेल्या. पुढील पिढ्यांसाठी या गोष्टींचं महत्त्वं अनन्यसाधारण ठरलं. अशा या टायटॅनिकशी संबंधित आणखी एक गोष्ट सध्या विक्रमी दरात विकली गेली आहे.
टायटॅनिकवरील जवळपास 700 जणांचे प्राण वाचवणाऱ्या एका कॅप्टनला देण्यात आलेलं सोन्याचं पाकिट जवळपास $2 million अमेरिकी डॉलर अर्थात 168,806,701.95 रुपयांना लिलावात विकलं गेलं आहे.
जहाजावरील तीन महिला प्रवाशांनी कॅप्टन आर्थर रोस्ट्रोन यांना 18 कॅरेट सोन्याचं Tiffany & Co. चं एक पॉकेट वॉच भेट स्वरुपात दिलं होतं. प्रवाशांनी भरलेलं जहाज RMS Carpathia च्या दिशेनं वळवत टायटॅनिकमुळं फसलेल्या प्रवाशांच्या बचावासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांसाठी ही कौतुकाची थाप होती.
नुकत्याच झालेल्या एका लिलावामध्ये याच घड्याळाची विक्री करण्यात आली असून, टायटॅनिकशी संबंधित, लिलाव झालेल्या वस्तूंपैकी ही सर्वाधिक बोली लागलेली वस्तू ठरली आहे. उपलब्ध माहितीनुसार कॅप्टनना हे घड्याळ या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या जॉन जेकब अॅस्टर नावाच्या धनाढ्य व्यक्तीच्या पत्नीनं दिलं होतं. त्या आणि त्यांच्यासह आणखी दोन व्यावसायिकांच्या पत्नींनी कॅप्टनच्या कृतीप्रती कृतज्ञता व्यक्त केली होती.
अॅस्टर यांचं हे 'पॉकेट वॉच' जहाजाला अपघात झाल्यानंतर साधारण 7 दिवसांनी त्यांच्याच मृतदेहावर आढळलं होतं. दरम्यान, टायटॅनिक जहाजाला अपघात घडला त्या रात्री दाखवलेल्या अद्वितीय साहसासाठी आणि अतिशय महत्त्वाचा निर्णय घेत टायटॅनिकच्या दिशेनं आपलं जहाज वळवत तिथं अडकलेल्या प्रवाशांची मदत करण्यासाठी रोस्ट्रोन यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता.
रोस्ट्रोन यांचं The Carpathia हे जहाज न्यूयॉर्कहून मेडिटेरेनियन समुद्रातून जाताना रेडिओ ऑपरेटरला टायटॅनिकसंदर्भातील माहिती मिळाली. 15 एप्रिल 1912 ला या माहितीनं रोस्ट्रोन यांनाही धक्का बसला आणि त्या क्षणी वाटेत येणारे हिमनग उध्वस्त करत त्यांनी मोठ्या साहसानं आपलं जहाज टायटॅनिकच्या दिशेनं वळवलं होतं.
The Carpathia घटनास्थळी पोहोचेपपर्यंत टायटॅनिकला जवळपास जलसमाधी मिळाली होती, 1500 प्रवासी बघता बघता समुद्रात बुडाले होते. पण, या जहाजावरील बचाव पथकानं तातडीनं 20 लाईफबोट काढत जवळपास 700 प्रवाशांचे प्राण वाचवत त्यांना न्यूयॉर्कला आणलं. या अदम्य साहसासाठी रोस्ट्रोन यांचा अमेरिकेत गौरव करण्यात आला. किंग जॉर्ज पाचवे यांनीसुद्धा त्यांच्या या साहसाचं कौतुक केलं होतं.