Japan PM Fires Son: राजकीय नेते आणि त्यांच्या नातेवाईकांना अनेकदा कायद्यापासून संरक्षण मिळतं अशी टीका केवळ भारतातच नाही तर जगभरातील अनेक देशांमध्ये सातत्याने होते. अगदी भ्रष्टाचार असो एखादा घोटाळा असो किंवा अन्य सवलती असो कायमच राजकारण्यांना कायद्याकडून झुकतं माप दिलं जातं असं मानणारे अनेकजण आहेत. मात्र जपानमध्ये नुकताच घडलेला प्रकार हा अशापद्धतीचे दावे खोडून काढणारा आणि आदर्श घेण्याजोगा आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही.
जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा (Fumio Kishida) यांनी आपल्याच मुलाला निलंबित केल्याने एकच खळबळ उडाली आहे. फुमियो यांच्या मुलाने सरकारी निवासस्थानावर केलेल्या एका खासगी पार्टीमुळे निर्माण झालेल्या वादानंतर हा कठोर निर्णय घेण्यात आला आहे. फुमियो यांनीच यासंदर्भाती घोषणा सोमवारी केली. माझा मुलगा सरकारी निवासस्थानी खासगी पार्टी केल्याच्या प्रकरणात दोषी आढळून आला असून तो आपल्या कार्यकारी निती सचिव पदाचा राजीनामा देत असल्याचं फुमियो यांनी जाहीर केलं.
असोसिएट प्रेस या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार फुमियो यांचे ज्येष्ठ चिरंजीव आणि त्यांच्या सरकारमध्ये राजकीय विषयासंदर्भातील कार्यकारी सचिव असलेल्या शोतारो किशिदा (Shotaro Kishida) यांनी पंतप्रधानांच्या सरकारी निवासस्थानी एका पार्टीचं आयोजन केलं होतं. 30 डिसेंबर 2022 च्या रात्री आयोजित करण्यात आलेल्या या पार्टीमध्ये शोतारो यांनी त्यांच्या काही नातेवाईकांबरोबरच काही निवडक लोकांना आमंत्रित केलं होतं. या पार्टीमधील फोटो येथील 'शुकन बुंशुन' नावाच्या साप्ताहिकाने प्रकाशित केल्यानंतर या प्रकरणावरुन वाद निर्माण झाला.
'शुकन बुंशुन'ने प्रकाशित केलेल्या या फोटोंमध्ये सरकारी निवास्थानी असलेल्या संपत्तीचा पाहुण्यांकडून गैरवापर झाल्याचं दिसत होतं. यावरुन मागील काही महिन्यांपासून जपानमध्ये चांगलाच वाद रंगला होता. "राजकीय विषयांचे सचिव म्हणून त्याचं वागणं फारच चुकीचं होतं. मी यासंदर्भात कारवाई करण्याचा निर्णय घेत त्याला पदावरुन हटवण्याचा निर्णय घेतला आहे," असं किशिदा यांनी सोमवारी रात्री प्रसारमाध्यमांना सांगितलं. उद्या म्हणजेच गुरुवारी ताकायोशी यामामोटो यांची पंतप्रधानांच्या मुलाच्या जागी नियुक्ती केली जाणार आहे. आपण या पार्टीमध्ये केवळ पाहुण्यांचं स्वागत करण्याच्या वेळापर्यंत उपस्थित होतो. नंतर झालेल्या डिनर पार्टीला आपण नव्हतो असंही किशिदा यांनी सांगितलं. आपण या प्रकरणानंतर मुलाला चांगलेच सुनावले मात्र विरोधक खासदारांबरोबरच सार्वजनिक माध्यमांकडून केल्या जाणाऱ्या टीकेला उत्तर देण्यास आणि त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तर देण्यास अपयशी ठरल्याचंही पंतप्रधान म्हणाले.
यापूर्वीही किशिदा यांच्या मुलाने सरकारी मालमत्तेचा गैरवापर केला. ब्रिटन आणि पॅरिस दौऱ्यादरम्यान खासगी प्रवासासाठी शोतारो किशिदा यांनी दुतावासातील गाड्यांचा वापर केला होता. तसेच लंडनमध्ये एका खासगी दुकानामध्येही त्यांनी सरकारी दौऱ्यादरम्यान शॉपिंग केल्याने मोठा वाद निर्माण झालेला.