Japan aircrafts collided : जपानची राजधानी टोक्योमधील हानेडा विमानतळावर दोन आठवड्यापूर्वी मोठी दुर्घटना (Passenger plane collided ) घडली होती. जपान एअरलाईन्सच्या एका विमानाला आग लागल्याने मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळालं होतं. अशातच आता जपानमधील होक्काइडो येथे दोन विमानांची टक्कर झाल्याचं समोर आलं आहे. पॅसिफिक एअरवेज (Pacific Airways) आणि कोरियन एअरलाइन्सच्या विमानांमध्ये (Korean Airlines) ही टक्कर झाल्याची माहिती मिळालीये. कॅथे पॅसिफिक विमानात एकही प्रवासी नव्हता. मात्र, कोरियन एअरलाइन्सच्या विमानात 289 प्रवासी होते, अशी माहिती अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे.
कॅथे पॅसिफिक एअरवेज आणि कोरियन एअरलाइन्सच्या विमानांमध्ये अवकाशात नाही तर जमिनीवर धडक झाल्याची माहिती जपानमधील अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही घटना सपोरोच्या न्यू चिटोस विमानतळावर उभ्या असलेल्या विमानांमध्ये झाली. उपस्थित असलेल्या कोरियन एअरच्या A330 विमानाशी पॅसिफिक विमानाची टक्कर झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण होतं. मात्र, सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही, असंही सांगण्यात आलंय.
कोरियन एअरलाइन्सच्या एका अधिकाऱ्याने यावर भाष्य करत सविस्तर माहिती दिली. कोरियन एअरचे विमान टोइंग करत असलेली टोइंग कार जमिनीवरील बर्फामुळे घसरली, ज्यामुळे विमानाचा डावा पंख कॅथे पॅसिफिक विमानाच्या उजव्या पंखावरून घसरला. मागच्या पंखावर आदळल्याने मोठी दुर्घटना घडली. मात्र, कोणत्याही प्रवाशाला काहीही झालं नाही, अशी माहिती कोरियन एअरलाइन्सच्या अधिकाऱ्याने दिलीये.
दरम्यान, जपानची राजधानी टोक्योमधील हानेडा विमानतळावर काही दिवसांपूर्वी धावपट्टीवर तटरक्षक दलाचं विमान आणि प्रवासी विमानाची टक्कर होऊन आग लागली होती. त्यामुळे या प्रकरणाची जपानच्या परिवहन आणि पर्यटन मंत्रालयाला दखल घ्यावी लागली होती. सततच्या बर्फवृष्टीमुळे अनेकांना प्रवास करू नये, असं आवाहन देखील करण्यात येत आहे. गेल्या चार दशकांमध्ये जपानध्ये अशी कोणतीही मोठी विमान दुर्घटना झालेली नाही. त्यामुळे प्रशासन देखील दखल घेताना दिसत आहे.