Pager Attack In Lebanon: इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणेची प्रत्येक कारवाई संपूर्ण जगातील जाणकारांना हैराण करून सोडत असतानाच आता या यंत्रणेनं अर्थात मोसादनं हिज्बुल्लाहवर पेजर साखळी हल्ला करत संपूर्ण जगालाच धक्का दिला. संवाद साधण्यासाठी वापरात असणाऱ्या या लहानशा उपकरणाच्या माध्यमातून इतका मोठा हल्ला घडवून आणला जाऊ शकतो याचा विचारही कोणी केला नसावा.
हिज्बुल्लाहच्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी साधारण 3 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास त्यांच्या वापरात असणाऱ्या पेजरचा अचानक स्फोट होण्यास सुरुवात झाली. या साखळी स्फोटांनंतर समोर आलेल्या माहितीनुसार प्रत्येक पेजरच्या बॅटरीजवळ स्फोटकं ठेवण्यात आल्याची खळबळजनक बाब लक्षात आली. फक्त स्फोटकंच नव्हे, तर त्यासोबत एक स्विचही तिथं देण्यात आला होता, या स्विचचा वापर करून पेजरपासून दूर राहूनही स्फोट घडवणं मोसादला शक्य झालं.
दुपासी साडेतीन वाजण्याच्या सुमारास हिज्बुल्लाच्या काही माणसांच्या पेजरमध्ये एक मेसेज दिसला आणि काही सेकंदांच्या बीप-बीप अशा आवाजानंतर पेजरमध्ये स्फोट होण्यास सुरुवात झाली. या साखळी स्फोटांच्या माध्यमातून लेबनान आणि सीरियातील हिज्बुल्लाह ऑपरेटीव्जना निशाण्यावर घेण्यात आलं.
रॉयटर्स आणि जगातील इतर नामांकित वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार आणि सूत्रांचा हवाला देत त्यांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार इस्रायलची संरक्षण यंत्रणा आयडीएफ आणि मोसाद यांनी संयुक्तरित्या ही खळबळजनक मोहिम फत्ते केली. न्यूयॉर्क टाईम्सच्या माहितीनुसार इस्रायलनं तैवानमध्ये तयार करण्यात आलेल्या पेजरमध्ये स्फोटकं लावली होती. ज्यानंर हेच पेजर लेबनाननं आयात करत हिज्बुल्लाहला दिले.
बीपर किंवा पेजर हे एक विद्युत उपकरण असून, त्या माध्यमातून लहानमोठे संदेश पाठवता आणि मिळवता येतात. रेडिओ फ्रिक्वेन्सीवर हे उपकरम काम करतं. यामध्ये जेव्हा एखादा मेसेज किंवा संदेश येतो तेव्हा बीप... असा आवाज होतो. सध्या हे पेजर फारसे वापरात नसले तरीही 90 च्या दशकात मात्र त्यांचा बराच वापर केला जात होता. पण, सध्याही पेजरचा वापर आरोग्य आणि आपात्कालीन व्यवस्था आणि सेवांमध्ये केला जातो.
दरम्यान, ज्या पेजरमध्ये मंगळवारी स्फोट घडून आला, त्यांचं उत्पादन तैवानमध्ये घेण्यात आलं होतं. गोल्ड अपोलो नावाच्या एका कंपनीकडून हिज्बुल्लानं हे पेजर मागवले होते. पण, लेबनानमध्ये पोहोचण्याआधीच या पेजरशी छेडछाड करण्यात आली होती. सूत्रांच्या माहितीनुसार त्यामध्ये 30 ते 50 ग्राम वजनाची स्फोटकं बॅटरीच्याच बाजुला लावण्यात आली होती. या स्फोटकांच्या शेजारी असणाऱ्या स्विचच्या माध्यमातून रिमेटच्या मदतीनं स्फोट घडवून आणण्याची मोहिम मोसाद आणि आयडीएफनं फत्ते करत हादरा दिला.
लेबनानमध्ये झालेले हे स्फोट एका मेसेजनं ट्रीगर करण्यात आले. स्फोटापूर्वी हिज्बुल्लाला एखाद्या लीडरशिपकडून मेसेज आल्याचं भासवण्यात आलं. बीर असा आवाज झाला आणि या मेसेजनं स्फोटकं सक्रिय करण्यात आली. स्फोटकं अशाच पद्धतीनं बसवण्यात आली होती, जी स्फोटाआधी काही सेकंद बीप असा आवाज करून पेजर असणाऱ्याची दिशाभूल करतील.
हे स्फोट झाल्यानंतर हिज्बुल्लानं इस्रायलवर या हल्ल्याप्रकरणी गंभीर आरोप करत मोसादनंच हे स्फोट घडवून आणल्याचं म्हटलं. दरम्यान इस्रायलनं याबबात कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.