'खूप छान मित्रा' : मोदींवर इमरान खान, पुतिनसह जगभरातील नेत्यांचा शुभेच्छांचा वर्षाव

श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनीही पंतप्रधानांसाठी शुभेच्छा संदेश धाडलाय

Updated: May 23, 2019, 05:51 PM IST
'खूप छान मित्रा' : मोदींवर इमरान खान, पुतिनसह जगभरातील नेत्यांचा शुभेच्छांचा वर्षाव  title=

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०१९ च्या निकालात भाजप आणि मित्रपक्षांनी बहुमताचा आकडा पार करत प्रचंड यश संपादन केलंय. यानंतर जगभरातून 'एनडीए'ची धुरा आपल्या खांद्यावर पेलणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतोय. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनीही सोशल मीडियावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना या विजयाच्या शुभेच्छा दिल्यात.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी संदेश धाडलाय. पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना पाठवलेल्या संदेशात लोकसभा निवडणुकीतील विजयाच्या शुभेच्छा दिल्यात. तर अफगानिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनीही पंतप्रधान मोदींना उद्देशून 'भारतीय नागरिकांद्वारे मिळालेल्या प्रचंड बहुमतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा. अफगानिस्तान सरकार आणि जनता दोन्ही लोकशाही देशांदरम्यान विस्तारासाठी तत्पर आहे' असं ट्विट केलंय. 

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी पंतप्रधान मोदींना विजयाच्या शुभेच्छा दिल्यात. सोबतच जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी फोनवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना विजयाच्या शुभेच्छा दिल्या. 

इस्राइलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतन्याहू यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना विजयाच्या शुभेच्छा देत ट्विट केलं. 'निवडणुकीतील शानदार विजयासाठी माझे मित्र नरेंद्र मोदी यांना हार्दिक शुभेच्छा! लोकसभा निवडणुकीतील विजय हा तुम्ही सर्वात मोठ्या लोकशाहीचं नेतृत्व करत असल्याची ग्वाही देतोय. भारत आणि इस्राईल दरम्यान मैत्री मजबूत करण्यासाठी सोबत प्रयत्न करू. खूप छान मित्रा' असं ट्विट नेतन्याहू यांनी केलंय. 

याशिवाय श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनीही पंतप्रधानांसाठी शुभेच्छा संदेश धाडलाय. 
 

लोकसभा निवडणुकीच्या हाती आलेल्या निकालांत कल स्पष्ट झालेत. भाजप आणि मित्रपक्षांना ३४८ जागांवर आघाडी आहे. तर काँग्रेस आणि मित्रपक्षांना केवळ १०४ चा आकडा गाठण्यात यश मिळालंय.