अमेरिकेत भारतीय दूतावासाबाहेरील गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना

काही दिवसांपूर्वी आंदोलकांनी व्हाईट हाऊसच्याबाहेरही निदर्शने केली होती. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बंकरमध्ये लपण्याची वेळ आली होती. 

Updated: Jun 4, 2020, 08:25 AM IST
अमेरिकेत भारतीय दूतावासाबाहेरील गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना

वॉशिंग्टन: अमेरिकेत सध्या वर्णद्वेषाच्या मुद्द्यावरून सुरु असलेल्या आंदोलनाने अत्यंत उग्र स्वरुप धारण केले आहे. अमेरिकेच्या अनेक भागांमध्ये सध्या निदर्शने सुरु आहेत. यापैकी वॉशिंग्टन येथील भारतीय दूतावासाबाहेर करण्यात आलेल्या निदर्शनावेळी महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. आंदोलकांनी या पुतळ्याची नासधुस केल्याचे समजते. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 
जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिसांच्या अमानुष वागणुकीमुळे मृत्यू झाल्यानंतर आंदोलनाची ठिणगी पडली होती. यानंतर आंदोलनाचे लोण संपूर्ण अमेरिकेत पसरले होते. त्यामुळे सध्या अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. 

काही दिवसांपूर्वी आंदोलकांनी व्हाईट हाऊसच्याबाहेरही निदर्शने केली होती. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बंकरमध्ये लपण्याची वेळ आली होती. यानंतर ट्रम्प यांनी आंदोलकांकडून सुरु असलेला हिंसाचार काबूत आणण्यासाठी लष्कराला पाचारण करण्याचा इशारा दिला होता. 

काय आहे प्रकरण?
जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिसांच्या अमानुष वागणुकीमुळे मृत्यू झाल्यानंतर आंदोलनाची ठिणगी पडली होती. २० डॉलर्सची बनावट नोट दिल्याप्रकरणावरुन या वादाला तोंड फुटलं. एका दुकानातून सिगरेटचं पाकिट खरेदी केल्यानंतर फ्लॉईडने बनावट नोट दिल्याप्रकरणी दुकानातील कर्मचाऱ्यानं पोलिसांत तक्रार दाखल केली. 

या तक्रारीनंतर पोलिसांचे पथक जॉर्ज फ्लॉईडला अटक करण्यासाठी गेले. पोलिसांनी त्याला पाहताक्षणी बेड्या ठोकल्या. यानंतर एका पोलिसाने त्याला जमिनीवर पालथे झोपवून त्याच्या गळ्यावर मागून गुडघा दाबून धरला. जवळपास आठ मिनिटे पोलीस अधिकाऱ्याने जॉर्ज फ्लॉईड यांच्या गळ्यावर गुडघा दाबून धरला होता. त्यामुळे जॉर्ज यांना श्वास घेता येत नव्हता. वारंवार विनंती करुनही पोलिसाने जॉर्ज यांच्या गळ्यावर गुडघा तसाच दाबून धरला. अखेर श्वास न घेता आल्याने जॉर्ज फ्लॉईड यांचा मृत्यू झाला.