'विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली। नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले'।। थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले हे काळाच्या कायमच पुढचा विचार करत असायचे, म्हणूनच की काय त्यांचे हे शब्द तेव्हाही आणि आजच्या काळातही लागू पडतात. माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी शिक्षणाचं कवच किती महत्त्वाचं आहे, यासाठी त्यांनी आपलं आयुष्य खर्च केलं. त्यांचाच हा वारसा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पुढे नेणारी देशात आणि परदेशातही अनेक मंडळी आहेत. त्यातलंच एक नाव म्हणजे मलाला युसुफ़ज़ई. 12 जुलै हा दिवस World Malala day म्हणून साजरा केला जातो.
मलाला ही मुळची पाकिस्तानची. तिचा जन्म 12 जुलै1997 पाकिस्तानात झाला. शिक्षण तर दूरच पण जिथे स्त्रियांना जगण्याच्या मुलभूत अधिकारांसाठी देखील संघर्ष करावा लागतो, अशा देशात या मुलीने शिक्षणक्षेत्रात मोलाचं कार्य केलं. मलाला हिचे वडील जियाउद्दीन युसुफ़ज़ई शिक्षक आहेत. त्यांची स्वत:च्या मालकीची शाळा आहे. हाच शिक्षकी पेशा मलालामध्ये आला. तिला लहानपणीच वडिलांकडून शिक्षणाचं आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचं बाळकडू मिळालं होतं. अवघ्या वयाच्या 11 व्या वर्षी मलालाने बीबीसी उर्दूमध्ये तालीबानी संघटनेविरुद्ध ब्लॉग लिहिण्यास सुरुवात केली. तिच्या या लिखाणाचा मोठा परिणाम झाला. शाळेतून घरी येत असताना मलालावर तालीबानी संघटनेने गोळ्या झाडल्या. मात्र दैत बलवत्तर म्हणून ती मोठ्या संकटातून वाचली. तिच्यावर हल्ला झाल्यानंतर इंग्लंडमध्ये तिच्यावर उपचार करण्यात आले.
तिच्या धाडसाची आणि कार्याची दखल घेत तिला 2014 मध्ये नोबेल शांति पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. पुरस्कार प्रदान करताना मलाल केवळ 17 वर्षांची होती. लहान वयात एवढा मोठा सन्मान मिळवणारी ती महिला आहे. तिच्या कार्याचा डंका जगभर पसरला. जगभरातील अनेकजण तिच्या कार्याला हातभार लावत आहेत. मलाला आणि तिचे वडील यांनी स्वत:ची शिक्षण संस्था सुरु केली आहे.ही संस्था मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलते आणि परदेशात मुलींना पुढील शिक्षण घेण्यासाठी मार्गदर्शन करते. मलालाच्या आयुष्यावर आधारित I Am Malala हे पुस्तक आंतराराष्ट्रीय पातळीवर बेस्ट सेलर बुक आहे. मलाला इथेच थांबत नाही. तिने ऑक्सफोर्ड विद्यापिठातून राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्राची पदवी मिळवली. तिने घेतलेला हा शिक्षणाचा वसा अखंड सुरु आहे.