गर्भवती पत्नीसाठी पती बनला 'खुर्ची'

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल 

Updated: Dec 8, 2019, 03:43 PM IST
गर्भवती पत्नीसाठी पती बनला 'खुर्ची'

मुंबई : एकमेकांना सुखी करण्याची भावना म्हणजे प्रेम. मग हे प्रेम आपण आपल्या कृतीतून व्यक्त करू शकतो. अशीच एक गोष्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चायनामधील एका व्यक्तीने आपल्या गरोदर पत्नीकरता उचलेलं पाऊल कौतुकास्पद आहे. सोशल मीडियावर 'प्रेमळ पती' म्हणून या व्यक्तीचं भरपूर कौतुक होत आहे. 

हा व्हिडिओ एका हॉस्पिटलमधील असून हे कपल तेथे गेले होतं. रूग्णालयात बसायचे सर्व बाकडे भरल्यामुळे गर्भवती स्त्रीला बसायला जागा नव्हती. अनेकांना विनंती करूनही कुणीही तिला बसायला जागा दिली नाही. डॉक्टरांना भेटण्यासाठी हे कपल अनेकवेळ थांबले होते. त्यानंतर थकलेल्या गर्भवती स्त्रीला उभं राहून त्रास होऊ लागल्यावर पुन्हा बसण्यास जागा शोधली. पण जागा काही सापडेना. त्यानंतर नवऱ्याने आपल्या पत्नीसाठी स्वतःच खुर्ची होण्याचा विचार केला. 

गर्भवती स्त्रीचा पती खाली मांडी घालून बसला आणि पुढे वाकला. त्या व्यक्तीच्या पाठीवर त्याची गर्भवती पत्नी बसली. तहान लागलेल्या पत्नीला त्याने पिण्यास पाणी देखील दिलं. खाली मान घालून बसलेल्या अवस्थेत गर्भवती स्त्रीचा नवरा बराच वेळ बसला. महत्वाचं म्हणजे अशा पद्धतीने गर्भवती स्त्री बसल्यानंतरही कुणीही तिला बसण्यासाठी जागा दिली नाही. हा सगळा प्रकार हॉस्पिटलच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. 

हा व्हिडिओ हेगँग पोलिसांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. पोलिसांनी या नवऱ्याला 'चांगला पती' अशी पदवी दिली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या नवऱ्याचं सगळ्याच स्तरावरून कौतुक होत आहे.