Meta Job Layoffs 2023: फेसबुकची (Facebook) पालक कंपनी असलेल्या मेटाने (Meta) पुन्हा एकदा मोठ्या कर्मचारी कपातीची घोषणा केली आहे. मेटाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ मार्क झुकरबर्ग (Meta CEO Mark Zuckerberg) यांनी काही महिन्यांपूर्वी केलेल्या मोठ्या कर्मचारी कपातीच्या घोषणेनंतर मेटाने पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. येणाऱ्या काही महिन्यांमध्ये कंपनी 5 हजार लोकांना कामावरुन काढून टाकणार असल्याचं कंपनीने जाहीर केलं आहे. कंपनीने मागील वर्षी तब्बल 11 हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं होतं. त्यानंतर आता काही महिन्यांमध्येच पुन्हा मेटामधून मोठ्याप्रमाणात कर्मचारी कपात होणार असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे.
मेटाने एका ब्लॉग पोस्टमधून या कर्मचारीकपातीसंदर्भातील माहिती दिली आहे. तसेच कंपनीने हा निर्णय घ्यावा लागत असल्याबद्दल कर्मचाऱ्यांची माफीही मागितली आहे. या ब्लॉगमधून सीईओ झुकरबर्ग यांनी येणाऱ्या काही महिन्यांमध्ये कंपनी टप्प्याटप्प्यात 5 हजार जणांना नोकरीवरुन काढणार असल्याचं जाहीर केलं आहे. याचबरोबर कंपनीने 5 हजार रिक्त जागांवरील भरती प्रक्रिया पूर्णपणे थांबवली आहे. म्हणजेच एकूण 10 हजार जणांना कंपनीने कामावरुन टाकण्याची घोषणा केली आहे.
झुकरबर्ग यांनी या निर्णयासंदर्भात घोषणा करताना हा फार कठीण निर्णय असल्याचं म्हटलं आहे. मला वाटतं की आपण आता यासाठी स्वत:ला तयार करणं गरजेचं आहे की हे नवीन आर्थिक वास्तव येणाऱ्या अनेक वर्षांपर्यंत कायम राहणार आहे, असंही झुकरबर्ग यांनी म्हटलं आहे. कंपनी एप्रिल महिन्याच्या शेवटाकडे कर्मचारीकपाताली सुरुवात करणार आहे. कंपनीशी संबंधित उद्योग विभागांमधील कर्मचारी कपात मेपर्यंत पूर्ण केली जाईल असं म्हटलं आहे. एकूण निश्चित कर्मचारीकपात या वर्षाच्या शेवटापर्यंत पूर्ण होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
झुकरबर्ग यांनी कर्मचारीकपातीची घोषणा केल्यानंतर मेटाचे शेअर्स 6 टक्क्यांनी वधारले आहेत. या छाटणीमुळे कंपनीचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याची शक्यता आहे. मेटाने दिलेल्या माहितीनुसार 2023 मध्ये कंपनीचा एकूण खर्च 86 अब्ज डॉलर्सवरुन 91 अब्ज डॉलर्सपर्यंत असण्याची शक्यता आहे. पूर्वी हा अंदाजित खर्च 89 ते 95 अब्ज डॉलर्सपर्यंत असण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
मेटाने मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात 11 हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकलं होतं. कंपनीने 18 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली. 2022 च्या शेवटापर्यंत मेटामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या 86 हजार 482 इतकी होती. वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार 2022 पासून आतापर्यंत कंपनीने 2.90 लाख कर्मचाऱ्यांना कमावरुन काढून टाकलं आहे. यापैकी 40 टक्के कर्मचाऱ्यांवर मागील वर्षभरामध्ये नोकरी गमावण्याची वेळ आली.