Modi In America: पंतप्रधान मोदी- उपाध्यक्ष कमला हैरिस यांची भेट ठरणार ऐतिहासिक

पंतप्रधान मोदी यांचा अमेरिका दौरा ठरणार खास

Updated: Sep 23, 2021, 03:37 PM IST
Modi In America: पंतप्रधान मोदी- उपाध्यक्ष कमला हैरिस यांची भेट ठरणार ऐतिहासिक title=

वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या विशेष अमेरिका दौऱ्यावर आहेत आणि भारतीय वेळेनुसार ते गुरुवारी रात्री उशिरा उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची भेट घेणार आहेत. ही बैठक अत्यंत खास असणार आहे, कारण भारतीय-अमेरिकन उपराष्ट्रपती पहिल्यांदाच अमेरिकन भूमीवर भारतीय पंतप्रधानांचे स्वागत करत आहेत.

अमेरिकन प्रसारमाध्यमेही या बैठकीकडे विशेष दृष्टीकोनातून पाहत आहेत, द लॉस एंजेलिस टाइम्स वृत्तपत्राने लिहिले आहे की, अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय समुदायासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. 56 वर्षीय कमला हॅरिस अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती आहेत, त्या भारतीय वंशाच्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या अमेरिकेच्या दौऱ्याची सुरुवात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन करणार आहेत आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेण्यापूर्वी कमला हॅरिस यांची भेट घेणार आहेत. या बैठकीवर एका अमेरिकन वृत्तपत्राने म्हटले आहे की, नरेंद्र मोदी-कमला हॅरिस यांच्या भेटीमुळे अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांना त्यांची शक्ती जाणवेल.

कमला हॅरिस यांनी यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी 3 जून रोजी फोनवर चर्चा केली, परंतु ही पहिली समोरासमोर बैठक होणार आहे. व्हाईट हाऊसच्या मते, कमला हॅरिस-पीएम मोदी भेटीचा केंद्रबिंदू भारत-अमेरिका मैत्री मजबूत करणे आहे. यामध्ये हवामान बदल, आरोग्य, मानवाधिकार, लोकशाही यासह इतर मुद्द्यांवर चर्चा होईल.

कमला हॅरिस यांची आई मुळच्या चेन्नईच्या होत्या. जेव्हा कमला हॅरिस यांनी उपराष्ट्रध्यक्ष म्हणून शपथ घेतली, तेव्हा भारतातही आनंद व्यक्त केला गेला होता.

कोरोना संकटाच्या दरम्यान पीएम मोदींचा हा पहिला मोठा परदेश दौरा आहे, ज्या दरम्यान पीएम मोदी अनेक महत्त्वाच्या बैठकांमध्ये भाग घेतील. कमला हॅरिस यांच्यासोबत भेट या व्यतिरिक्त अमेरिकन कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबतही बैठक होणार आहे. तसेच जो बायडेन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा होईल, क्वाड देशांसोबत संयुक्त बैठक होणार आहे आणि ऑस्ट्रेलिया-जपानच्या पंतप्रधानांशी द्विपक्षीय चर्चाही होईल.