Women Health : असं म्हणतात, की मानवी शरीरात असणाऱ्या असंख्य गोष्टींपुढे विज्ञानानंही माघार घेतली आहे. काही व्याधी, अडचणी अशा आहेत ज्यांच्यावर पूर्णपणे उपचार अद्यापही शोधण्यात आलेला नाही. अनेक औषधं करुनही आपल्या अडचणी दूर होत नाहीत, असं म्हणणाऱ्यांमध्ये काही महिलांचा सूर एकाच दिशेनं झुकताना दिसतो. ती दिशा म्हणजे मासिक पाळी आणि त्याच्याशी निगडीत काही व्याधींची.
मासिक पाळीमध्ये (Priods) होणारा त्रास, अनेकदा अनियमित मासिक पाळी, पाळीदरम्यान होणारा रक्तस्त्राव या आणि अशा अनेक समस्यांशी सध्या महिला लढा देताना दिसत आहेत. मुळात या मुद्द्यावर गेल्या काही वर्षांमध्ये न्यूनगंड न बाळगता बोललंही जात आहे. पण, अद्यापही काही गोष्टींकडे मात्र समाज थट्टा- मस्करीच्या नजरेतूनच पाहत आहे ही शोकांतिका.
नुकताच सोशल मीडियावर एक फोटो समोर आला. या फोटोमध्ये महिलेनं दाढी- मिशा वाढवल्याचं दिसत होतं. प्रथमदर्शनी नेटकऱ्यांनी या फोटोंची खिल्ली उडवली. काहींनी हा काय प्रकार असं म्हणत तिच्यासंदर्भातील बरेच प्रश्नही विचारले. पण, वास्तव समोर येताच अनेकांना खडबडून जाग आली.
आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत असणारी ही महिला बकिंघमशेअरच्या Aylesbury मधील. तिचं नाव Annette. PCOS चा त्रास असल्यामुळं तिच्या चेहऱ्यावरील केसांची वाढ होते. हीच अडचण तिनं जगासमोर आणत स्थानिक पबमध्ये दाढीमिशा कापल्या आणि यातून £2,000 इतका निधी गोळा करत ती तिनं तो समाजोपयोगी कामांसाठी देऊ केला आणि पीसीओएसविषयी जनजागृती केली.
अनियमित मासिक पाळी (irregular periods), चेहऱ्यावर गडद काळ्या रंगाचे आणि जाड केस येणं, सतत मनस्थिती बदलणं, चेहऱ्यावरील काळे डाग (Acne) अशा समस्यांचा तिनं सामना केला. इतकंच काय, तर या महिलेला गर्भधारणा करणंही जवळपास अशक्य. वयाच्या 14 व्या वर्षापासून तिला या अडचणी सतावू लागल्या होत्या.
PCOS म्हणजे नेमकं काय?
पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम (PCOS) हा महिलांच्या अंडाशयाशी संबंधित एक आजार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये या समस्येनं त्रस्त असणाऱ्या महिलांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. यादरम्यान महिलांच्या शरीरात फीमेल हार्मोनऐवजी मेल हार्मोन्सचं प्रमाण वाढतं. ज्यामुळं दीर्घकाळ चालणाऱ्या समस्या भेडसावू लागतात.
मूल न होणं, गर्भावस्थेतील अडचणी, टाइप- 2 डायबिटीज (diabetes), हायपरटेंशन (hypertension), कार्डियोवॅस्कुलर डिसऑर्डर अशा व्याधी यामुळं बळावतात. निरीक्षणांनुसार स्थुलतेनं त्रस्त महिला आणि PCOS पीडित महिलांमध्ये नैराश्य आणि मानसिक आजारांचंही प्रमाण चिंताजनकरित्या वाढत चाललं आहे. त्यामुळं या स्थितीवरून कोणत्याही महिलेविषयी वेडंवाकडं बोलण्यापूर्वी परिस्थितीची पूर्ण माहिती करुन घ्या, तेच उत्तम ठरेल.