close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

करतारपूर : पाकिस्तानमध्ये सिद्धू यांच्याकडून इम्रान खान यांचं पुन्हा कौतुक

पाकिस्तानकडून आणि इम्रान खान यांच्याकडून नवजोत सिंह सिद्धू यांना या कार्यक्रमाचं पहिलं निमंत्रण पाठवण्यात आलं होतं

Updated: Nov 9, 2019, 05:42 PM IST
करतारपूर : पाकिस्तानमध्ये सिद्धू यांच्याकडून इम्रान खान यांचं पुन्हा कौतुक

लाहोर : काँग्रेस आमदार आणि पंजाबचे माजी मंत्री नवजोत सिंह सिद्धू (Navjot singh sidhu) शनिवारी करतारपूर कॉरिडोरद्वारे पाकिस्तानात दाखल झाले. करतारपूर साहेब गुरुद्वारामध्ये माथा टेकून आपण धन्य झाल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं. यावेळी, पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्यासमोर झालेल्या भाषणात नवजोत सिंह सिद्धू यांनी आपल्या मित्राचं अर्थात इमरान खान यांचं तोंडभरून कौतुक केलं. शिख समुदायाचा आवाज ऐकल्याबद्दल त्यांचे आभारही मानले. 'ही पहिलीच वेळ आहे जेव्हा दोन्ही देशांदरम्यान फाळणीनंतर भिंती तुटून पडल्यात. यासाठी माझा मित्र इम्रान खान यांचं योगदान कुणीही नाकारू शकत नाही. मी मोदीजींनाही यासाठी धन्यवाद देतो' असं यावेळी सिद्धू यांनी म्हटलं. 

करतारपूरला जाण्यासाठी सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतर नवजोत सिंह सिद्धू इतर ५०० भाविकांसोबत इंटीग्रेटेड चेक पॉईंटवरून कॉरिडोरद्वारे करतारपूर साहेब गुरुद्वारामध्ये दाखल झाले. पाकिस्तानकडून आणि इम्रान खान यांच्याकडून नवजोत सिंह सिद्धू यांना या कार्यक्रमाचं पहिलं निमंत्रण पाठवण्यात आलं होतं. इतकंच नाही तर त्यांना व्हिजाही देण्यात आला होता. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांनी कोणत्याही नफ्या-तोट्याची चिंता न करता जे केलं ते गेल्या ७२ वर्षांत होऊ शकलं नव्हतं. यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. यासाठी मी पंतप्रधान मोदींना मुन्नाभाई एमबीबीएस स्टाईलनं मिठी पाठवतो... आमच्यात राजकीय मतभेद असले तरी यासाठी मी मोदींचे आभार मानतो. 

करतारपूरमध्ये याच गुरुद्वाराच्या ठिकाणी शीख धर्मगुरु गुरु नानक यांच्या मृत्यू १६ व्या शतकात झाला होता, असं मानलं जातं.

१२ नोव्हेंबर रोजी गुरु नानक देव यांच्या ५५० वा जयंती सोहळा आयोजित करण्यात आलाय. या निमित्तानं पाकिस्तानच्या करतारपूर साहेब गुरुद्वाराला भेट देणाऱ्या गटाला भाविकांनाही पंतप्रधान मोदी रवाना करतील. 

उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वी नवजोत सिंह सिद्धू इम्रान खान यांच्या शपथविधी कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी पाकिस्तान आर्मी चीफ जनरल बाजवा आणि खलिस्तान समर्थक गोपाल चावला यांच्यासोबत त्यांचा फोटो समोर आल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता.