मालक असावा तर असा! करोडो रुपयांची प्रॉपर्टी नोकराच्या नावे केली, कारण...

Trending News In Marathi: एका नोकराचे नशीबच फळफळले आहे. मालकाने त्याची संपूर्ण प्रॉपर्टी त्याच्या नावे केली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: May 13, 2024, 03:17 PM IST
 मालक असावा तर असा! करोडो रुपयांची प्रॉपर्टी नोकराच्या नावे केली, कारण...  title=
owner leaves whole assets to servant in china

Trending News In Marathi: अनेकदा असं होतं की आयुष्यासाठी तुम्ही काही तरी ठरवता. मात्र तसं होईलच याची काही खात्री नसते. म्हातारपणात कुटुंबीय तुमची साथ देतीलच याची काही शाश्वती नसते. अशावेळी आयुष्याच्या या वळणावर एकटं पडल्यावर मानसिकरित्या ते पूर्णपणे उद्ध्वस्त होतात व दुखी होतात. काहीजण या वर मात करुन एकटं जगायला शिकतात व आपल्याच लोकांना माफ करतात. तर, काही जण हे नाकारुन आपल्याच लोकांविरुद्ध काही कठोर पावलं उचलतात. चीनमध्ये राहणाऱ्या एका आजोबांनीदेखील असंच काहीसं केलंय. 

चीनमध्ये राहणाऱ्या एका आजोबांनी त्यांची करोडो रुपयांची प्रॉपर्टी घरातील मुलांच्या नावे न करता त्यांच्या घरी राहणाऱ्या नोकराच्या नावे केली आहे. साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, हे आजोबा बिजिंग येथील रहिवाशी आहे. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांना यावर विश्वास ठेवणही कठिण जातंय. रुआन असं अडनाव या वृद्धाचे आहे. 

रुआन यांचा 1930 रोजी जन्म झाला होता. त्यांनी कधीच लग्न नव्हते केले. तसंच, त्यांनी कधी मुलंही दत्तक घेतले नाही. त्यांच्या आई-वडिलांचेही कमी वयातच निधन झाले होते. अशावेळी ते पूर्णपणे एकटे पडले होते. 2011 साली त्यांनी त्यांच्याच गावातील एका मुलाला बोलवले. त्याचे नाव लियू असे होते. लियु त्यांच्या जवळच राहून त्यांची सेवा करत होता. त्यांना काही हवं नको ते सगळं काळजीने करायचा. रुआन यांच्या मृत्यूपर्यंत तो त्यांच्या सोबत राहिला. त्यांची खूप काळजी घेतली. त्यांना कोणताही त्रास होणार नाही यासाठी तो त्याच्या संपूर्ण कुटुंबाला सोबत घेऊन आला होता. 

रुआन यांची लियू खूप काळजी घ्यायचा. त्याची ती काळजी व स्वभाव बघून रुआन यांनी त्यांची संपूर्ण संपत्ती त्याच्या नावे केली. त्यांनी 800 स्केअर मीटरचे घर तोडून त्याजागी एक मोठी इमारत उभारली. त्यातील 5 फ्लॅट्स लियूच्या नावावर करण्यात आले. या 4 फ्लॅट्सची किंमत कोटी रुपयांमध्ये आहेत. जेव्हा रुआन यांच्या कुटुंबीयांना म्हणजेच पुतणे व भाच्यांना कळले तेव्हा त्यांनी रुआन यांच्या या निर्णयाला कोर्टात आव्हान दिलं. मात्र रुआन यांचे मृत्यूपत्र पाहून कोर्टाने त्यांची याचिका फेटाळली व नोकराच्या पक्षात निर्णय दिला. नोकर कोटींच्या संपत्तीचा मालक झाला.