मुंबई : रशिया - युक्रेनदरम्यान सुरू असलेल्या युद्धादरम्यान रशियाला सार्वजनिकरित्या पाठिंबा देणारा पाकिस्तान पहिला देश ठरला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी रशियासोबतच्या नवीन व्यापारी करारावर स्वाक्षरी केली आहे. रशियाचे अध्यक्ष पुतिन यांची भेट घेतल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सांगितले की पाकिस्तानने रशियाकडून सुमारे दोन दशलक्ष टन गहू आणि नैसर्गिक वायू आयात करण्याचा करार केला. त्याच दिवशी रशियाने शेजारील युक्रेनवर लष्करी आक्रमण सुरू केले.
रशियाला आंतरराष्ट्रीय निर्बंधांचा सामना करावा लागत असून त्याची अर्थव्यवस्था खिळखिळी होत आहे. पंतप्रधान इम्रान खान म्हणाले की, "आम्हाला रशियातून दोन दशलक्ष टन गहू आयात करायचा आहे, तसेच पाकिस्तानचे स्वतःचे गॅसचे साठे कमी होत असल्याने नैसर्गिक वायू आयात करण्यासाठी आम्ही त्यांच्याशी करार केला आहे..'
युद्धामुळे पाश्चात्त देशांनी रशियावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे रशियाचे चलन असलेले रुबल आतापर्यंतच्या सर्वात निच्चांकी पातळीवर घसरले आहे. त्यामुळे एकीकडे जग रशियावर निर्बंध घालत असताना, पाकिस्तान मात्र व्यापरी करार करण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.